बार्शी – नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीलाच MahaOnline प्रणालीच्या मंद गतीमुळे राज्यभरातील सेतू केंद्रे आणि महा-ई सेवा केंद्रांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत असून विद्यार्थी, पालक तसेच केंद्र चालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जून महिन्यापासून शाळा व महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. दहावी, बारावी तसेच उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र आदी विविध शासकीय कागदपत्रांची आवश्यकता भासत आहे. ही बहुतांश कागदपत्रे MahaOnline प्रणालीद्वारेच उपलब्ध होत असल्याने सेतू व महा-ई सेवा केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
मात्र, MahaOnline प्रणालीची गती अत्यंत मंद असल्याने अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे तसेच अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यास मोठा विलंब होत आहे. अनेक वेळा सर्व्हर डाऊन होणे, पेज लोड होण्यास जास्त वेळ लागणे आणि तांत्रिक अडचणी निर्माण होणे अशा समस्यांमुळे नागरिकांना तासन् तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी आणि पालकांना बसत असून आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध होत नसल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रांसाठी वारंवार सेतू व महा-ई सेवा केंद्रांच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार आहे.
शाळा-महाविद्यालयांकडून अर्जाची
पावती घेण्यास नकार
दरम्यान, काही शाळा व महाविद्यालयांकडून केवळ अर्जाची पावती स्वीकारण्यास नकार दिला जात असून मूळ कागदपत्रांचीच मागणी केली जात असल्याचे विद्यार्थी व पालकांनी सांगितले. त्यामुळे प्रवेशाची मुदत जवळ येत असताना विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढत आहे.
दुसरीकडे, प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे केंद्र चालकांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हरच्या समस्यांमुळे कामकाज ठप्प होत असताना नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत असल्याने केंद्र चालकांमध्येही असंतोषाचे वातावरण आहे.
MahaOnline प्रणालीची गती तातडीने सुधारावी, सर्व्हर क्षमता वाढवून कागदपत्रे मिळविण्याची प्रक्रिया सुरळीत करावी तसेच शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी, पालक तसेच सेतू आणि महा-ई सेवा केंद्र चालकांकडून करण्यात येत आहे. शैक्षणिक प्रवेशाच्या अत्यंत महत्त्वाच्या कालावधीत प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालकांकडून व्यक्त होत आहे.
Post Views: 6