बार्शी – ‘दैनिक पुण्यनगरी’चे बार्शी तालुका प्रतिनिधी तथा पत्रकार प्रशांत चंद्रकांत खराडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बार्शीतील पत्रकार बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून, संबंधित हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
या संदर्भात बार्शीतील पत्रकार आणि विविध पत्रकार संघटनांच्या ्ने्न्ने््ने्न्ने् वतीने तहसीलदार एफ. आर. शेख यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पत्रकार प्रशांत खराडे यांनी दिनांक ३१ मे २०२६ रोजी आपल्या पत्रकारितेच्या कर्तव्याचा भाग म्हणून एका दगड खाणीतील अवैध उत्खननासंदर्भात वार्तांकनासाठी छायाचित्रण केले होते. सदर छायाचित्रे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी संबंधित कार्यालयालाही पाठविण्यात आली होती.
मात्र, ही बाब काही व्यक्तींना खटकली असून, बार्शीतील सचिन ऊर्फ बाळू जाधव याने पत्रकार खराडे यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकारांवर होणारे हल्ले हे केवळ एखाद्या व्यक्तीवरील हल्ले नसून ते लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि सत्य मांडणाऱ्या पत्रकारितेवर केलेले हल्ले आहेत. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे अत्यंत आवश्यक असल्याचे पत्रकारांनी निवेदनात नमूद केले आहे.
यापूर्वीही बार्शी परिसरात पत्रकारांना धमकावण्याच्या आणि दहशत निर्माण करण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याची खंत पत्रकारांनी व्यक्त केली.
संबंधित हल्लेखोरांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा बार्शीतील सर्व पत्रकार एकत्रितपणे तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडतील, असा इशाराही निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.
तहसीलदार एफ. आर. शेख यांना निवेदन सादर करताना बार्शी प्रेस क्लबचे अध्यक्ष सचिन अपसिंगकर, उपाध्यक्ष चंद्रकांत करडे, सचिव गणेश गोडसे, खजिनदार उमेश पवार, शहाजी फुरडे, विनोद ननवरे, गणेश शिंदे, शाम थोरात, प्रवीण पावले, मयूर थोरात, भूषण देवकर, भीमराज जानराव, विजय शिंगाडे, किरण माने उपस्थित होते.
Post Views: 15