सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीलाच मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी पंचायत समिती शिक्षण विभागाने व्यापक आणि सूक्ष्म नियोजन केले आहे. तालुक्यात प्राप्त झालेली इयत्ता पहिली ते आठवीची मोफत पाठ्यपुस्तके केंद्रस्तरावर वेळेत पोहोचवून शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या हाती देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे.
गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक यांनी याबाबत आदेश जारी करत विषय साधनव्यक्ती, विशेष शिक्षक आणि संबंधित केंद्रप्रमुखांना वितरण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. बालभारती, पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचा यू डायस वरील पटसंख्येनुसार ताळमेळ घालून वितरण केले जाणार आहे. ज. रा. चंडक प्रशाला, बाळे येथे १० ते १२ जून दरम्यान केंद्रनिहाय वेळापत्रक आखण्यात आले असून प्रत्येक केंद्राने आवश्यक मनुष्यबळ आणि वाहनासह उपस्थित राहून पुस्तके स्वीकारायची आहेत. त्यानंतर केंद्रस्तरावरून शाळांना तात्काळ वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाठ्यपुस्तक वितरण प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, म्हणून इयत्तानिहाय जबाबदाऱ्या विषय साधनव्यक्ती व विशेष शिक्षकांमध्ये वाटण्यात आल्या आहेत. पुस्तकांची मोजणी, वर्गीकरण, वितरण तक्ते तयार करणे, बिलांची पूर्तता, केंद्रनिहाय वाटप, अहवाल सादरीकरण तसेच कमी-जादा पुस्तकांचे समायोजन यासाठी स्वतंत्र कार्यविभाजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, विद्यार्थी लाभाच्या या महत्त्वाच्या योजनेत कोणताही हलगर्जीपणा होऊ नये यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना वितरण कालावधीत विनापरवानगी गैरहजर राहू नये, तसेच तक्रारींना वाव मिळणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर सोलापूर शिक्षण विभागाने केलेले हे नियोजन शिक्षण व्यवस्थेतील सुयोग्य प्रशासनाचे उदाहरण मानले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया पहिल्याच दिवसापासून भक्कम होण्यास मदत होणार आहे.
Post Views: 13