सोलापूर – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी थेट संबंध असलेल्या अनधिकृत शाळांविरोधात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात विनापरवानगी सुरू असलेल्या १५ शाळांची यादी जाहीर करून त्या शाळांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित शाळांना नोटिसा बजावून दंडात्मक कारवाई करावी, तसेच त्या बंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
प्राथमिक शिक्षण विभागाकडून गेल्या वर्षभरात विविध पत्रांद्वारे, ऑनलाईन बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गटशिक्षणाधिकारी व स्थानिक प्रशासनाला अनधिकृत शाळांची माहिती सादर करण्यासह त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक ठिकाणी या शाळा अद्याप सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने शिक्षण विभागाने नाराजी व्यक्त केली आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, अनधिकृत शाळांची नावे स्थानिक वृत्तपत्रे, जाहीर फलक आणि सार्वजनिक माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात यावीत, जेणेकरून पालकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. अनेकदा आकर्षक इमारती, इंग्रजी माध्यमाचा गाजावाजा किंवा आधुनिक शैक्षणिक सुविधांच्या नावाखाली पालकांची दिशाभूल केली जाते. अशा शाळांना शासनाची अधिकृत मान्यता नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची शासनमान्यता, मान्यता आदेश आणि यू-डायस क्रमांक यांची खात्री करूनच प्रवेश निश्चित करावा.
दरम्यान, ज्या कार्यक्षेत्रात अनधिकृत शाळा सुरू राहतील आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात दुर्लक्ष होईल, त्या ठिकाणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. कारवाईबाबत हलगर्जीपणा आढळल्यास त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये सोलापूर महापालिका क्षेत्रातील नोबल विस्डम प्री-प्रायमरी स्कूल, ट्विंकल इंग्लिश मिडीयम स्कूल, नारायण ई-टेक्नो स्कूल, विष्णूपंत कोठे मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल, इकरा इस्लामिक स्कूल अँड मक्तब स्कूल, श्री चैतन्य टेक्नो स्कूल, आर्यन वर्ल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांचा समावेश आहे.
याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील एशियन इनोव्हेटिव्ह मॉडर्न स्कूल (वळसंग) आणि नागेश करजगी ऑर्किड स्कूल (कंदलगाव), पंढरपूरमधील फिनिक्स इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच सांगोला तालुक्यातील सांगोला गुरुकुल, हनुमान इंग्लिश मिडीयम स्कूल (कटफळ), बाळुमामा गुरुकुल आणि विश्वशोभा पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय (मेडशिंगी) यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, शिक्षण विभागाने ही कारवाई केवळ नियमभंग करणाऱ्या संस्थांविरोधात नसून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि पालकांची फसवणूक रोखण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत कोणतीही जोखीम न घेता अधिकृत आणि शासनमान्य शाळांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.