सोलापूर – खरेदी केलेल्या टेरी टॉवेलचे रुपये न देता सोलापुरातील एका कारखानदाराची तब्बल 40 लाख41 हजार 161 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील एका व्यापाऱ्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाझीम नासीम खान (रा. पॅरामाऊंड सोसायटी लि, सीटीएस सहकार रोड, जोगश्वेरी, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या त्या व्यापाऱ्याचे नाव असून याबाबत शकील अहमद फैजल अहमद ताडपत्री (वय 44, रा. व्यंकटेश नगर, मुमताज नगर मस्जिद समोर, कुमठा नाका, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील फिर्यादी हे अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये ‘अमीम ट्रेडिंग कंपनी’ या नावाने टेरी टॉवेलचा व्यवसाय करतात.
3 ऑगस्ट 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत यातील आरोपीनी फिर्यादी कडून वेळोवेळी टेरी टॉवेलचा माल खरेदी केला. या खरेदीचे एकूण 40 लाख 41 हजार 161 रुपये बिल झाले होते. आरोपीने हा माल खरेदी केला, मात्र त्याचे बिल अद्यापपर्यंत फिर्यादीला दिले नाही.वारंवार पैशांची मागणी करूनही आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसात धाव घेऊन आरोपी विरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक येळे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 22