सोलापूर – जिल्हा परिषदेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासह ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी मोहोळ तालुक्यातील यावली येथील जिल्हा परिषद शाळा, अनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चिंचोली काटी येथील घरकुल योजनेच्या कामांची पाहणी करून विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत झालेल्या या दौऱ्यात शैक्षणिक गुणवत्ता, आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि विकास योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती त्यांनी जाणून घेतली. समूह उपक्रम, कृतीतून शिक्षण आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व सर्जनशीलता वाढविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. केवळ सुविधा उपलब्ध करून न थांबता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत प्रत्यक्ष सुधारणा दिसली पाहिजे, हा या भेटीचा महत्त्वाचा संदेश ठरला.
यावेळी मोहोळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तेजश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक आणि विस्तार अधिकारी नागसेन कांबळे उपस्थित होते.
चौकट
आरोग्यसेवांचा घेतला प्रत्यक्ष आढावा
अनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑपरेशन थिएटर, औषधसाठा, प्रयोगशाळेतील तपासणी सुविधा आणि विविध विभागांची पाहणी करण्यात आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून दैनंदिन कामकाज, उपलब्ध सुविधा आणि अडचणींची माहिती घेत नागरिकांना वेळेत दर्जेदार आरोग्यसेवा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
चौकट
घरकुल योजनेचीही तपासणी
चिंचोली काटी येथे घरकुल योजनेच्या लाभार्थ्याच्या घरी भेट देऊन बांधकामाची स्थिती आणि उपलब्ध सुविधांची पाहणी करण्यात आली. योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो की नाही, याचीही त्यांनी खातरजमा केली.
चौकट
शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन
यावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सध्या ‘ड’ वर्गात आहे. या शाळेचा दर्जा उंचावून ‘क’ किंवा ‘ब’ वर्गात आणण्यासाठी शिक्षकांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे निर्देश कुशल जैन यांनी दिले. शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक नियोजन, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेची त्यांनी पाहणी केली.