सोलापूर – पंढरपूर येथील प्रसिद्ध ‘परिमल सांस्कृतिक व्यासपीठ’ यांच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा मानाचा ‘काव्य परिमल’ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोलापूरचे ज्येष्ठ कवी मारुती कटकधोंड यांच्या ‘डोहतळ’ या काव्यसंग्रहाला अत्यंत थाटामाटात प्रदान करण्यात आला. पंढरपूर येथे आयोजित एका विशेष दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या शुभहस्ते हा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यासाठी व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी प्रा. डॉ. शिवाजी शिंदे, मराठी साहित्य परिषद पुणे, पंढरपूर शाखेचे अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे, पंढरपूरचे युवा नेते प्रणव परिचारक, आदर्श माता व सामाजिक कार्यकर्त्या पुष्पलता निकम तसेच परिमल सांस्कृतिक व्यासपीठचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते कवी मारुती कटकधोंड यांना हा पुरस्कार सुपूर्द करण्यात आला. अत्यंत देखणे व सुंदर स्मृतीचिन्ह, पुस्तकांचा संच, शाल आणि पुष्पगुच्छ असे या राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप होते.
*डोहतळ’चा चौफेर डंका; कटकधोंड यांच्याकडून कृतज्ञता*
पुरस्कार स्वीकारल्यानंतर कवी मारुती कटकधोंड यांनी परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचे आभार मानले व भावना व्यक्त करताना आपल्या संवेदनशील लेखणीतून साकारलेली एक सुंदर कविता सादर केली, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. विशेष उल्लेखनीय म्हणजे, मारुती कटकधोंड यांच्या ‘डोहतळ’ या काव्यसंग्रहाची साहित्यिक मूल्ये एवढी उच्च दर्जाची आहेत की, यापूर्वीही या संग्रहाला तब्बल २३ विविध साहित्यिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘काव्य परिमल’ पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या सोहळ्याला पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यातील अनेक नामवंत साहित्यिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि बहुसंख्येने रसिक श्रोते उपस्थित होते. संपूर्ण सभागृह साहित्याच्या रंगात न्हाऊन निघाले होते. परिमल सांस्कृतिक व्यासपीठाने केलेल्या या दर्जेदार नियोजनाचे आणि कवी कटकधोंड यांच्या साहित्याचे सर्व स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.
Post Views: 12