अक्कलकोट – एका गुन्ह्यामध्ये जप्त केलेली स्कॉर्पिओ वाहन व मोबाईल परत देऊन गुन्ह्यातील आरोपींना मदत करण्यासाठी एका तक्रारदाराकडून १ लाख ४० हजार रुपयाची लाच मागून तडजोडीनंतर
१ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांसाठी काम करणाऱ्या एका खाजगी व्यक्तीला सोलापूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर रंगेहात पकडले .मात्र या कारवाई दरम्यान दोन पोलीस हवालदार फरार झाले .दरम्यान याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या एका खाजगी व्यक्तीसह फरार झालेल्या उत्तर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलीस हवालदार राजशेखर रामचंद्र कोळी ( राहणार अशोक चौक सोलापूर ), पोलीस शिपाई लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे (राहणार – पोलीस वसाहत , अक्कलकोट )आणि खासगी व्यक्ती आकाश शरण्णाप्पा काडरामे (राहणार -आझाद गल्ली अक्कलकोट ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून अटक करण्यात आलेल्या आकाश काडरामे या आरोपीस आज मंगळवारी दुपारी सोलापूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .
यातील तक्रारदाराच्या नातेवाईकांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्यात दोघांना अटक ही झाली होती . सदर गुन्ह्याच्या तपासात वरील दोघा पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडी व तक्रारदाराच्या लहान भावाचा मोबाईल ताब्यात घेतले होते .आणि सदर गुन्ह्या मध्ये तक्रारदाराच्या वडिलांचे आणि काकांचे नाव घालून त्यांना अटक करण्याची भीती दाखवण्यात आली. दरम्यान वरील दोघा पोलिसांनी वाहन आणि मोबाईल परत मिळवून देण्यासाठी व नातेवाईकांना मदत करण्याच्या बदल्यात सुरुवातीला १ लाख ४० हजार रुपयांची मागणी केली. नंतर तडजोडीनंतर ही रक्कम १ लाख २० हजार रुपये देण्याचे ठरले .यादरम्यान तक्रारदाराने सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याबाबत तक्रार दाखल केली .त्यानंतर
एसीबी पथकाने या तक्रारीची पडताळणी व पुष्टी करून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे परिसरात सापळा लावला असता यातील आरोपी खाजगी इसम आकाश काडरामे हा ठरल्याप्रमाणे यातील तक्रारदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात सापडून आला . कारवाई होताच लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस मात्र परिसरातून फरार झाले .या दोघांचा रात्री उशिरापर्यंत एसीबीच्या पथकाने शोधाशोध केला .गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलेश पवार हे करीत आहेत .
सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते , पोलीस अंमलदार संतोष नरोटे, गजानन किणगी, अक्षय श्रीराम यांनी पार पाडली आहे.
Post Views: 7