सोनपेठ – अधिक मासानिमित्त पवित्र स्नानासाठी गेलेल्या सोनपेठ तालुक्यातील मोहळा येथील एकाच कुटुंबातील तिघींचा गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मोहळा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासाचा शेवटचा दिवस असल्याने मोहळा येथील समीक्षा उत्तम जाधव (वय १६ वर्षे), उत्कर्षा उत्तम जाधव (वय १८ वर्षे) आणि सिंधू दत्ता जाधव (वय ४५ वर्षे) या गोदावरी नदीत पवित्र स्नानासाठी गेल्या होत्या. सकाळच्या वेळी नदीत अंघोळ करत असताना समीक्षा आणि उत्कर्षा या दोघीं बहिणीं पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात जाऊन बुडू लागल्या. यावेळी दोघींना पाण्यात झुंजताना पाहताच त्यांना वाचविण्यासाठी सिंधू दत्ता जाधव यांनी कोणताही विचार न करता नदीत उडी घेतली. मात्र, नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्या देखील पाण्यात बुडाल्या. काही क्षणांतच तिघीही नदीच्या पाण्यात बेपत्ता झाल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. स्थानिकांच्या अथक प्रयत्नांनंतर काही वेळाने तिघींचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, सोनपेठ येथे रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात आले.या दुर्दैवी घटनेची बातमी गावात पसरताच मोहळा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. एकाच कुटुंबातील तिघींचा मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर मोठा आघात झाला असून नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. सर्वत्र शोकमय वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, दौलत जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ पोलीस करीत आहेत.



















