बार्शी – नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळ संचालित शेठ अगरचंद कुंकुलोळ हायस्कूल व प्राथमिक विद्यामंदिर, बार्शी येथे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवेश उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्प, पुस्तके आणि खाऊ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रवेश उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास वृक्ष संवर्धन समितीचे संस्थापक अध्यक्ष उमेश काळे, सदस्य सुनिल फल्ले, नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळाच्या उपाध्यक्षा वनिताताई हलगणे आणि खजिनदार मोहनभाई बुचडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उमेश काळे म्हणाले, वृक्षांमुळे आपल्याला अन्न, प्राणवायू, सावली आणि कागद मिळतो. तसेच जमिनीची धूप रोखण्यासही वृक्षांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या घरी वृक्षारोपणासाठी जागा उपलब्ध आहे, त्यांनी वृक्ष संवर्धन समितीशी संपर्क साधावा. समितीच्यावतीने त्यांना मोफत रोपे उपलब्ध करुन दिली जातील.
कार्यक्रमास पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळाचे संचालक रावसाहेब मनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश उत्सव यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विद्यामंदिरचे सहशिक्षक अभिमन्यू सातपुते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका योगिता बेळे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक दीपक उंबरदंड, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी विशेष सहकार्य केले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रेरणादायी वातावरणात झाली असून नवागत विद्यार्थ्यांवर उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.