
सोलापूर – ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सर्वसमावेशक आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील सर्वसमावेशक आरोग्य सेवा अंतर्गत तब्बल ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण मोहिमेला मंगळवारपासून प्राथमिक आरोग्य केंद्र, कोंडी येथे प्रारंभ झाला.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत आयवळे यांच्यासह विविध तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविणे, रोगांचे वेळेत निदान करणे आणि नागरिकांना अधिक प्रभावी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक-साहाय्यिका, आरोग्य सेवक-सेविका आणि आशा स्वयंसेविकांचा समावेश आहे. जिल्हाभरातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिनाभर चालणाऱ्या या प्रशिक्षणासाठी १० तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवांमध्ये अधिक परिणामकारकता येईल, नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील आणि प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला.
कोट
सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख बनविण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड यांनी सांगितले.
कोट
जिल्ह्यातील ४,७४१ प्रशिक्षणार्थ्यांसाठी ११६ स्वतंत्र बॅचेस तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बॅचमध्ये ४० प्रशिक्षणार्थी सहभागी होणार असून आठवड्यातून दोन वेळा दोन बॅचेसचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक घटकाला अद्ययावत ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त होणार आहेत.नोडल अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे यांनी माहिती देताना सांगितले.
Post Views: 26