सोलापूर – जिल्ह्यात यंदा पावसाळ्यानंतरही भूजल पातळीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर २०२६ च्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी आणखी ०.३३ मीटरने खोल गेली आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईच्या तीव्र संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील तब्बल १ हजार १३ गावे आणि वाड्या संभाव्य टंचाईग्रस्त म्हणून समोर आल्या आहेत.
जिल्ह्यातील १५८ निरीक्षण विहिरींच्या आधारे भूजल पातळीचा आढावा घेण्यात आला आहे. या निरीक्षणानुसार सप्टेंबर २०२६ मध्ये जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी ६.३८ मीटर होती. ऑक्टोबरमध्ये ती ६.७१ मीटरपर्यंत खोल गेली. विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांची सरासरी भूजल पातळी सप्टेंबरमध्ये ३.४० मीटर, तर ऑक्टोबरमध्ये ३.४१ मीटर होती. यंदाची प्रत्यक्ष भूजल पातळी या तुलनात्मक सरासरीपेक्षा लक्षणीय खोल असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
तालुकानिहाय भूजल स्थितीचा विचार करता सांगोला तालुक्यात सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती दिसून आली आहे. ऑक्टोबर महिन्यात सांगोल्यात भूजल पातळीतील तफावत तब्बल ४.५७ मीटर नोंदविण्यात आली आहे. तर जिल्हास्तरावर सप्टेंबरमधील २.९८ मीटरची तफावत ऑक्टोबरमध्ये वाढून ३.३० मीटर झाली आहे. त्यामुळे भूजल साठ्यावरील वाढता ताण अधोरेखित होत आहे.
संभाव्य पाणीटंचाईच्या कालावधीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या पहिल्या टप्प्यातच ६१२ गावे आणि वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागू शकतो. ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या संपूर्ण कालावधीसाठी संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या १ हजार १३ इतकी आहे. त्यामुळे केवळ उन्हाळ्यापुरते नव्हे, तर आगामी नऊ महिन्यांचे पाणी नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
भूजल पातळीतील सातत्याने होणारी घसरण लक्षात घेता प्रशासनाला आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन करावे लागणार आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे पर्यायी स्रोत निश्चित करणे, बंद पडलेल्या विहिरी व पाणीपुरवठा योजनांची स्थिती तपासणे, आवश्यक ठिकाणी टँकरची पूर्वतयारी ठेवणे तसेच भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.
एकीकडे १ हजार १३ गावे-वाड्यांवर संभाव्य टंचाईचे सावट असताना दुसरीकडे भूजल पातळीतील घसरणीची आकडेवारी प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. त्यामुळे संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी केवळ कागदावर न ठेवता तालुकानिहाय प्रत्यक्ष परिस्थिती तपासून वेळेत उपाययोजना केल्या जातात का, याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
चौकट
माहे ऑक्टोबर २०२६ : सोलापूर जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट
मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत भूजल पातळी ३.३० मीटरने खोल; सांगोला, बार्शी आणि माढा तालुक्यांत सर्वाधिक घसरणसोलापूर जिल्ह्यातील भूजल पातळीबाबत ऑक्टोबर २०२६ मधील निरीक्षणातून चिंताजनक चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील भूजल पातळीची मागील पाच वर्षांतील ऑक्टोबर महिन्याची सरासरी ३.४१ मीटर होती. मात्र, ऑक्टोबर २०२६ मध्ये ही पातळी ६.७१ मीटरपर्यंत खोल गेली आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा भूजल पातळीत सरासरी ३.३० मीटरने घट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १५८ निरीक्षण विहिरींच्या आधारे हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहता सांगोला तालुक्यात सर्वाधिक ४.५७ मीटरने भूजल पातळी खोल गेली आहे. त्यापाठोपाठ बार्शी तालुक्यात ४.०३ मीटर, माढा तालुक्यात ३.७० मीटर, अक्कलकोट तालुक्यात ३.६२ मीटर आणि उत्तर सोलापूर तालुक्यात ३.५३ मीटरने घट झाली आहे. मंगळवेढा तालुक्यात ३.३० मीटर, मोहोळमध्ये ३.०७ मीटर, करमाळ्यात २.९५ मीटर, दक्षिण सोलापूरमध्ये २.५१ मीटर, पंढरपूरमध्ये २.७३ मीटर, तर माळशिरस तालुक्यात २.३० मीटरने भूजल पातळी खोल गेल्याचे दिसून येते.विशेष म्हणजे, सांगोला तालुक्यात भूजल पातळी ८.३४ मीटर, तर माढा तालुक्यात ८.०२ मीटरपर्यंत खोल गेली आहे. यावरून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये भूजल साठ्यावरील ताण वाढत असल्याचे स्पष्ट होते.