बार्शी – शेतातून चोरीस गेलेल्या जॉन डिअर कंपनीच्या ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या पाच तासांत उघडकीस आणला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ९० किलोमीटर अंतरापर्यंत पाठपुरावा करीत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भोईंजे येथील सोज्वल बबन चव्हाण यांचा जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर त्यांच्या शेतातून रात्रीच्या वेळी चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे याच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
भोईंजे गावातीलच तीन युवकांनी ट्रॅक्टर चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संकेत सर्जेराव करळे, प्रेम धर्मराज नवले आणि प्रथमेश संजय सुरवसे या तिघांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीचा ट्रॅक्टर माढा-पंढरपूर रोडवरील तुळशी गावाजवळील जंगल परिसरात लपवून ठेवल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टरसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल हस्तगत केली. अवघ्या पाच तासांत ९० किलोमीटरचा माग काढत गुन्हा उघडकीस आणल्याने बार्शी तालुका पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
Views: 8