टेंभुर्णी – येथील पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपास कन्हेरगावरोड ब्रिज खाली दोन गटांमध्ये झालेल्या वादातून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप करत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मारहाण, धमकी, जबरदस्तीने पैसे काढून घेणे तसेच हत्यारांचा वापर केल्याचे आरोप संबंधित तक्रारींमध्ये करण्यात आले आहेत.
टेंभुर्णी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास कन्हेरगाव ब्रिज परिसरात ही घटना घडली.
पहिल्या फिर्यादीनुसार, झिरपे वस्ती (टेंभुर्णी) येथील मंगेश भारत देशमुख (वय २६) यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सकाळी झालेल्या भांडणानंतर आपापसातील वाद मिटवून घेण्यासाठी फोनद्वारे बोलावण्यात आले. त्यानुसार ते कन्हेरगाव ब्रिजखाली गेले असता तेथे उपस्थित असलेल्या संबंधित व्यक्तींनी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच खिशातील सुमारे २० हजार रुपये काढून घेतल्याचा आणि पोलिसांकडे तक्रार दिल्यास जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या तक्रारीवरून टेंभुर्णी येथील लखन बाकले तसेच वेणेगाव (ता. माढा) येथील तुषार जाधव व नितीन कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोना/३३९ केशव झोळ करीत आहेत.
दरम्यान, याच घटनेप्रकरणी दुसऱ्या बाजूनेही स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. वेणेगाव येथील तुषार भारत जाधव (वय २५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या काही सहकाऱ्यांसह टेंभुर्णी परिसरात थांबले असताना काही व्यक्तींनी त्यांना कन्हेरगाव ब्रिज परिसरात नेले. त्यानंतर सकाळी झालेल्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करून लोखंडी गज, काठी, दगड तसेच दांडक्याच्या साहाय्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, या मारहाणीत डोके, पाठ आणि पायावर दुखापत झाली असून, पुढे आमच्या नादी लागल्यास पिस्तूलाने गोळ्या घालण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रणजित अटकळे, रत्नदीप अटकळे, रितेश देशमुख, निलेश देशमुख, शैलेश देशमुख, समाधान देशमुख व नागेश मुळे (सर्व रा. टेंभुर्णी) यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशन चे पोहेकॉ/१८२९ जाधव हे करीत आहेत