सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या कायम आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता मेडिक्लेम विमा योजना राबविण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सर्व विभागप्रमुख व खातेप्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यासंदर्भात परिपत्रक उपायुक्त आशिष लोकरे यांनी काढले आहे.
मेडिक्लेम विमा योजना राबविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या परिवहन उपक्रम व शिक्षण मंडळातील सेवक वगळता इतर सर्व विभागांतील कायम, रोजंदारी, मानधन, कंत्राटी व बदली कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांची माहिती विहित नमुन्यात सादर करावी लागणार आहे. संबंधित माहिती आधार कार्डवर नमूद असलेल्या नावांनुसार इंग्रजी भाषेत एक्सेल शीट व गुगल शीटमध्ये भरून सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपीसह दि. २० जूनपर्यंत कामगार कल्याण व जनसंपर्क कार्यालयाकडे सादर करण्याचे परिपत्रक उपायुक्त आशिष लोकरे यांनी काढले आहे.
महापालिकेने कुटुंबियांची व्याख्याही स्पष्ट केली असून त्यामध्ये पती किंवा पत्नी, आई-वडील, महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आई-वडील किंवा सासू-सासरे यांपैकी एक पर्याय, तसेच २५ वर्षांपर्यंतची दोन अविवाहित अपत्ये यांचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रसूतीवेळी जुळी अपत्ये असल्यास प्रथम अपत्यासह दोन्ही जुळ्या अपत्यांचाही कुटुंबाच्या व्याख्येत समावेश होणार आहे. आस्थापना लिपिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडून अद्ययावत माहिती संकलित करून कोणत्याही कर्मचाऱ्याचे अथवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव वगळले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच हे परिपत्रक सर्व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. उपायुक्त आशिष लोकरे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार माहिती सादर करण्याची अंतिम मुदत २० जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
मेडिक्लेमसाठी यांचा राहणार समावेश
यासाठी पती किंवा पत्नी, आई-वडील, महिला कर्मचाऱ्यांसाठी आई-वडील किंवा सासू-सासरे यांपैकी एक पर्याय, वय वर्षे २५ पर्यंतची दोन अविवाहित अपत्ये,
दुसऱ्या प्रसूतीवेळी जुळी अपत्ये असल्यास प्रथम अपत्यासह दोन्ही जुळ्या अपत्यांचा समावेश राहणार आहे.
Post Views: 13