सोलापूर : कला दीर्घा या आंतरराष्ट्रीय दृश्यकला नियतकालिक आणि जेबीएनएसएस, अयोध्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय ’कलर्स ऑफ अयोध्या’ या कला शिबिरात देशभरातून सहभागी झालेल्या चित्रकारांनी आपल्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला.
यामध्ये महाराष्ट्रामधून सोलापूरचे ज्येष्ठ चित्रकार डॉ. डग्लस जॉन आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार रामचंद्र खरटमल यांनी आपल्या कुंचल्यातून अयोध्या, प्रभू श्रीराम आणि भारतीय सांस्कृतिक वारसा आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत कॅनव्हासवर विविध कलाकृती सादर केल्या.
ज्येष्ठ चित्रकार डॉ . डग्लस जॉन यांनी सुमारे दोन दशकांपूर्वी त्यांनी पाहिलेल्या अयोध्येचे चित्र रेखाटले. अयोध्या ही केवळ धार्मिक नगरी नसून तिचे अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक पैलू आहेत. ’कलर्स ऑफ अयोध्या’ सारख्या उपक्रमांमुळे हे विविध पैलू समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. याच शिबिरात चित्रकार रामचंद्र खरटमल यांनी एका चित्रातून अयोध्या आणि कोरिया यांच्यातील सांस्कृतिक संबंधांचे चित्रण केले, तर दुसर्या कलाकृतीत प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीचे वास्तववादी दर्शन घडवले.
या शिबिरातील सर्व कलाकृती प्रदर्शनात ठेवणार असून ही चित्रे कलाप्रेमींना पाहण्यासाठी उद्या (शुक्रवार) पर्यंत येथील कला रसिकांना पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन जेबी अकॅडमीच्या बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले आहे.
Post Views: 13