सोलापूर – राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. योगेश पवार यांनी सोलापूर शहरातील अत्यंत अनियमित, अपुरा व दूषित पाणी पुरवठ्याबाबत महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यांत सविस्तर हकीकत अशी की, उजनी धरणातून मुबलक पाणी उपलब्ध असतानाही सोलापूरकरांना पाच ते सहा दिवसांतून केवळ एकदाच पाणी मिळत आहे. सार्वजनिक आरोग्याच्या निकषांनुसार प्रत्येक नागरिकाला आवश्यक प्रमाणात स्वच्छ पाणी मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेक भागांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
याशिवाय शहरातील अनेक भागांत कमी क्लोरीनेशन, गळकी पाईपलाईन आणि मलमिश्रित पाण्याच्या पुरवठ्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉईड यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही भागांत काळ्या व दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
पाणीपुरवठा सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपयांची कामे व निविदा काढण्यात आल्या असतानाही त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या संपूर्ण योजनेचा स्वतंत्र तृतीय पक्षामार्फत दर्जा तपासणी अहवाल व खर्चाचा ऑडिट अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. अॅड. योगेश पवार यांनी महापालिका प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या कालावधीत नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू न झाल्यास सोलापूर महापालिकेविरोधात उच्च न्यायालय अथवा जिल्हा न्यायालयात जनहिताच्या दृष्टीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.






















