सोलापूर : शहरासाठी प्रस्तावित १३७८ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये, सर्व भागांना समान व नियोजनबद्ध पाणीपुरवठा मिळावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया तातडीने राबवून कामांना गती देण्याचे आदेशही महापौर विनायक कोंडयाल यांनी दिले.
महाराष्ट्र शहरी पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पुनर्वापर कार्यक्रमाच्या अनुषंगाने तसेच सोलापूर शहरासाठी प्रस्तावित १३७८ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर विनायक कोंडयाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठका पार पडल्या. आज झोन क्रमांक एक आणि दोन ची बैठक झाली. या बैठकांमध्ये उपस्थित नगरसेवकांनी आपल्या सूचना मांडल्या.महापौर विनायक कोंडयाल यांनी उपस्थित नगरसेवकांच्या सूचना जाणून घेतल्या. यावेळी नगरसेवकांनी विविध तांत्रिक प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, नगरसेविका तथा अध्यक्ष रोहिणी तडवळकर, नगरसेवक अनंत जाधव, नगरसेवक बिजू प्रधाने,नगरसेवक समाधान आवळे , नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेविका श्रद्धा पवार, नगरसेविका अलका भवर, नगरसेवक विनायक विटकर, नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक अविनाश पाटील,नगरसेवक राजू पाटील, नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे, नगरसेवक गौतम कसबे, नगरसेविका राजश्री कणके, नगरसेविका पूनम काशीद,ज्ञानेश्वर कारभारी,दत्तात्रय बडगु, किरण पवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी-१ चे सुनीता हिबारे,विभागीय अधिकारी -२ चे सरकाझी सहाय्यक अभियंता शाम कन्ना राउफ शेख,एच मुजावर, समीर जोशी, शशिकांत भुदे किशोर पत्तेवाले, अमर फारूक बागवान, मधुकर साळुंखे, सुचिता अमेणगी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळी झालेल्या बैठकीत विभागीय क्रमांक १ मधील प्रभागा 4,5,7 येथील नगरसेवक यावेळी उपस्थिती होते.१३७८ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणे, प्रत्येक नागरिकापर्यंत समान व पुरेसा पाणीपुरवठा पोहोचविणे, पाण्याची गळती रोखणे, वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे तसेच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.तसेच संबंधित प्रभागांमध्ये प्रस्तावित पाण्याच्या टाक्या, नव्याने उभारण्यात येणाऱ्या जलकुंभांची ठिकाणे, जुन्या व जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाक्यांचे पुनर्बांधणी अथवा बदल, नवीन जलवाहिन्या (पाईपलाईन), विद्यमान पाईपलाईनचे मजबुतीकरण व विस्तार, वितरण नेटवर्कमधील सुधारणा यासंदर्भातील सविस्तर माहिती नगरसेवकांना सादरीकरणाद्वारे देण्यात आली. प्रभागनिहाय नियोजित कामांचा आराखडा, त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक माहिती आणि कामांच्या अंमलबजावणीची रूपरेषा यावरही चर्चा करण्यात आली.
यानंतर झोन क्रमांक २ अंतर्गत प्रभाग क्रमांक १, २ व ३ मधील नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्या भागातील पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागांतील विविध बाबी महापौरांच्या निदर्शनास आणून दिल्या. बैठकीत १३७८ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन, तांत्रिक बाबी आणि पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनेमुळे सोलापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा होऊन नागरिकांना दीर्घकालीन, शाश्वत व समान पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नगरसेवकांनी उपस्थित केल्या
आराखड्याबाबत अनेक तांत्रिक शंका
नव्या झोनिंग पद्धतीमुळे पाणीपुरवठा क्षेत्रांचे विभाजन करण्यात येणार असून त्यामुळे कमी क्षमतेच्या टाकीतूनही नियोजनबद्ध आणि अखंडित पाणीपुरवठा शक्य होईल. अवंती नगर आणि एबीडी क्षेत्रातील विविध भागांना स्वतंत्र जलसाठा केंद्रांमधून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.मात्र बैठकीदरम्यान नगरसेवकांनी प्रस्तावित आराखड्याबाबत अनेक तांत्रिक शंका उपस्थित केल्या. विद्यमान टाक्यांचा वापर कायम राहणार का, नवीन टाक्यांमुळे साठवण क्षमतेत वाढ होणार का, तसेच उंच आणि सखल भागांमध्ये समान व सुरळीत पाणीपुरवठा कसा केला जाणार याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.यशनगर, वसंत विहार आणि अवंती नगर परिसरातील पाइपलाइन जोडणी, नवीन लाईनचे मार्ग, पाण्याचा दाब आणि वितरण व्यवस्था याबाबतही नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली.
प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून
अंतिम नियोजन करण्याची मागणी
काही लोकप्रतिनिधींनी विद्यमान आराखडा जुन्या नकाशांवर आधारित असल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अंतिम नियोजन करण्याची मागणी केली. यावर अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या बाबींचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच पाणीपुरवठा योजनेत पारदर्शकता राखून नागरिकांच्या सूचना आणि स्थानिक गरजांनुसार आवश्यक बदल करण्याची तयारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.बैठकीत आगामी काळात प्रत्यक्ष स्थळ पाहणी, तांत्रिक सादरीकरण आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांनंतर अंतिम आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.
————-
Post Views: 31