सोलापूर – जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १९ वर्षांखालील मुलांच्या जिल्हा क्रिकेट संघाची निवड चाचणी शनिवार, २७ आणि रविवार, दिनांक २८ जून रोजी इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० या वेळेत पार पडणार आहे.
या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी खेळाडूची जन्मतारीख १ सप्टेंबर २००८ नंतरची असणे बंधनकारक आहे. ज्या खेळाडूंनी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे आधीच नोंदणी केली आहे, त्यांनाच या चाचणीत भाग घेता येईल. ज्या खेळाडूंनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी २६ जून २०२६ पर्यंत असोसिएशनच्या कार्यालयात स्वतःची नोंदणी करून घ्यावी.
निवड चाचणीसाठी ५०० रुपये फी असोसिएशनच्या कार्यालयात QR कोडवर जमा करायची आहे. चाचणीसाठी येताना या फीची पावती सोबत आणणे व त्याची एक प्रत तिथे जमा करणे आवश्यक आहे. चाचणीच्या दिवशी सकाळी ९:०० ते ११:०० या वेळेत रिपोर्टिंग करणाऱ्या खेळाडूंनाच चाचणीत उतरता येईल, त्यानंतर येणाऱ्या खेळाडूंना प्रवेश दिला जाणार नाही.
खेळाडूंनी पांढऱ्या गणवेशात उपस्थित राहावे. या संघाची निवड करण्यासाठी श्री. सुनील मालप (चेअरमन, निवड समिती), उदय डोके, शिवानंद अकलूजकर, किशोर बोरामणी आणि अनिल जाधव यांची निवड समिती काम पाहणार आहे. पात्र खेळाडूंनी या निवड चाचणीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेबर्सो यांनी केले आहे.




















