करमाळा – येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह-सरकार्यवाह आणि थोर समाजसेवक कै. मदनदास देवी यांचे नाव देण्यात येणार आहे. या नामकरणानिमित्त येत्या मंगळवारी, ३० जून २०२६ रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता संस्थेच्या प्रांगणात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) प्रदेशाध्यक्ष डॉ. शांतिनाथ बगवेवाडी आणि प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.
– करमाळ्याचे सुपुत्र आणि कुशल संघटक
मूळचे करमाळा (जि. सोलापूर) येथील असलेल्या मदनदासजी देवी यांचे राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय राहिले आहे. त्यांनी एम.कॉम., एलएल.बी. आणि चार्टर्ड अकाउंटंट असे उच्च शिक्षण पूर्ण केले होते. १९६९ मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून स्वतःला राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) भक्कम उभारणीत, वैचारिक मांडणीत आणि देशव्यापी विस्तारात मदनदासजींचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर त्यांनी संघाचे ‘अखिल भारतीय सह-सरकार्यवाह’ म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली.
– संघ-भाजपमधील समन्वयाचा मुख्य दुवा
अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या कार्यकाळात मदनदासजी यांनी संघ आणि भाजपमधील मुख्य समन्वयक (दुवा) म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थतीतही सरकार आणि संघ परिवार यांच्यात योग्य ताळमेळ राखण्याचे काम त्यांनी पडद्यामागून अतिशय मुत्सद्दीपणे केले.अत्यंत साधी राहणी, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि माणसांची अचूक पारख हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आज राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक दिग्गजांना सुरुवातीच्या काळात ओळखण्यात आणि त्यांचे नेतृत्व घडवण्यात मदनदासजींचे मोलाचे योगदान राहिले आहे.
त्यांच्या या राष्ट्रकार्याचा आणि स्थानिक भूमीशी असलेल्या नात्याचा गौरव म्हणून करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला त्यांचे नाव देण्यात येत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे करमाळा परिसरासह राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळातून तीव्र आनंद व्यक्त होत आहे. ३० जून रोजी होणाऱ्या या सोहळ्याला नागरिक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 16