
सोलापूर – होटगी रोड येथील होत असलेल्या सिमेंटच्या रस्त्यामुळे अनेक अपघात झालेले असून, कंत्राटदाराच्या चुकीमुळे अनेक नागरिक हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत. अशाप्रकारे बेजबाबदारपणा करून जनतेच्या जीविताशी खेळ करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. यापुढे एकही अपघात झाला तर संभाजी आरमाराला आंदोलन करावे लागेल असा इशारा उपजिल्हाधिकारी यांना उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
होटगी रोड ते आसरा चौक येथे सध्या नवीन सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. वास्तविक पाहता शहर हद्दीतील पूर्वीचा डांबरी रस्ता अतिशय सुस्थितीत होता. तरीदेखील हा रस्ता नव्याने केला जात आहे. रस्त्याचे काम भर लोकवस्तीत सुरु असून या रस्त्यावर वर्दळ देखील मोठ्या प्रमाणावर आहे. असे असताना रस्त्यावर वाहतूक करणाऱ्यांना कोणताही अपघात होऊ नये याची योग्य ती खबरदारी घेऊन काम करणे बंधनकारक आहे. सुरक्षाविषयक उपाययोजना करूनच कामे केली पाहिजेत. मात्र अशी कोणतीही काळजी न घेता काम रेटून नेले जात असल्यामुळे अनेक अपघात झाले असून बरेच जण जायबंदी झाले आहेत. काही जण तर कायमचे अपंग झाले आहेत. त्यांच्या उपचारावर लाखो रुपये खर्च होणार असून पुढील आयुष्यात त्यांना काम देखील करणे अवघड होणार आहे. हे अपघात केवळ यां रस्त्याच्या कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे झाले असून, त्यामुळे येथील अपघातग्रस्तांना या कंत्राटदारांकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तसेच यापुढे अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून जरूर ते सुरक्षाविषयक उपायययोजना करण्याचे आदेश द्यावेत.
यावेळी संभाजी आरमारचे सरचिटणीस गजानन जमदाडे, शहरप्रमुख सागर ढगे, अविनाश विटकर, मल्लिकार्जुन पोतदार, सतीश सारोळे, महेश घोडके, प्रदीप मोरे, सुधाकर करणकोट, मनोज पंगुडवाले, प्रवीण मोरे आणि अपघातग्रस्त कुटुंबातील आतिक शेख उपस्थित होते.




















