सोलापूर: शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत भरवस्तीत बंद घर फोडून लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी सुरजितसिंग राजपालसिंग टाक (वय ३५) व त्याचा साथीदार मंजित कुमार (रा. उत्तर प्रदेश) या सराईत गुन्हेगारांसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या लक्ष्मण गणेश रणशिंग (वय २७) आणि संतोष विलास साबळे (वय २९, दोघेही रा. हडपसर, पुणे) ,अब्दुल वहिद अब्दुल कादर शेख (वय ४५, रा. रविवार पेठ, पुणे; मूळ रा. पश्चिम बंगाल) या ३ सराफांनाही अटक केली असून, सुमारे १० लाख ६३ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. २५ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ ते २६ मे रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास, जुळे सोलापूर येथील म्हेत्रे टॉवर जवळ असलेल्या एका बंद घराचे लॉक तोडून अज्ञातांनी प्रवेश केला होता. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटातून तब्बल २१७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासात शहर गुन्हे शाखेचे सपोनि शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तब्बल ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेतला.
तांत्रिक विश्लेषणातून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी हडपसर (पुणे) येथे छापा टाकून मुख्य आरोपी सुरजितसिंग राजपालसिंग टाक याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपला साथीदार मंजित कुमार याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी १५६.५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य असा एकूण १० लाख ६३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने , सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार जावेद जमादार, विनोद रजपूत, इम्रान जमादार, धिरज सातपुते, उमेश पवार, सुभाष मुंडे, वसिम शेख, काशिनाथ वाघे, आबा सावळे, सैपन सय्यद, विठ्ठल यलमार, राजू मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, अंकुश भोसले, बापू साठे, महेश शिंदे, अनिल जाधव, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे व मारुती घोरपडे यांच्या पथकाने बजावली आहे .
Post Views: 9