सोलापूर : गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही गणपती घाटावरील विसर्जन कुंडात मागील वर्षापासूनचे घाणेरडे व दुर्गंधीयुक्त पाणी साचून असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. विसर्जनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिका प्रशासनाकडून कुंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसेने संताप व्यक्त केला.
उद्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होणार असून, त्यानंतर दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन सुरू होणार आहे. हजारो भाविक या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणार असताना कुंडातील अस्वच्छ पाणी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, अशी चिंता मनसेने व्यक्त केली.
महापालिकेला गणेशोत्सवाच्या तारखा माहिती असतानाही शेवटच्या क्षणापर्यंत विसर्जन कुंडाची स्वच्छता का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. कुंडातील जुने पाणी तातडीने काढून स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून भाविकांसाठी सुरक्षित व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
कुंडाची लवकरात लवकर स्वच्छता न केल्यास प्रशासनाने घेतलेली झोप या दुर्गंधीयुक्त पाण्यात घालवू, असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी दिला.
यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख महेश धाराशिवकर, सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे कार्यवाह संजय शिंदे, कार्याध्यक्ष विजय पुकाळे, रणजीत गडमिरे, अमित लाड यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी व गणेशभक्त उपस्थित होते.
Post Views: 19