
बार्शी – भालगाव ता. बार्शी येथील माजी सैनिक, माजी उपसरपंच व इतर नागरिक पंचायत समिती बार्शी कार्यालयासमोर भालगाव ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची चौकशी होण्यासाठी उपोषणास सोमवारी सकाळी बसले. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक चव्हाण, कुलकर्णी यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली परंतु त्यावर तोडगा न निघाल्यामुळे सायंकाळी पाच वाजता गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलन करते देवदत्त दराडे यांची भेट घेऊन तक्रारीत नमूद असलेल्या सर्व प्रकरणाची तीन दिवसात सखोल चौकशी करुन अहवालानुसार दोषीवर योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल, अशी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. भालगाव ग्रामपंचायतमध्ये १५ वित्त आयोग व इतर शासकीय निधीचा गैरवापर करुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भालगाव येथील देवदत्त दराडे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केला होता. यापूर्वी अनेक वेळा अर्ज करुन त्याच्यावरती दखल घेतली नाही. माहिती अधिकारमध्ये माहिती देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी यांनी २१ हजार रुपये भरुन घेतले परंतु माहिती दिली नाही याविषयी कोणतीही कार्यवाही पंचायत समितीकडून करण्यात येत नाही. यामुळे २९ जून रोजी पंचायत समिती समोर गावातील नागरिकासह उपोषण दराडे यांनी सुरु केले होते.
माजी सैनिक देवदत्त दराडे यांनी भालगाव ग्रामपंचायतीमधील १ जानेवारी २०१६ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीतील विकास कामांचे अंदाजपत्रक, खर्च, निविदा प्रक्रिया आणि ग्रामसभा प्रोसिडिंगची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज दाखल केला होता. यावर ग्रामसेवक रामेश्वर चौरे यांनी १०,२०० पानांच्या माहितीसाठी प्रति पान २ रुपये याप्रमाणे २०,४०० रुपये आणि टपाल खर्च ३०० रुपये असे एकूण ‘२०,७०० रुपये’ भरण्याचे लेखी पत्र दिले. त्यानुसार दराडे यांनी नोव्हेंबर २०२५ रोजी ही रक्कम ग्रामपंचायतीत कायदेशीररीत्या रोख स्वरू्पात जमा केली आणि त्याची पावतीही (पावती क्र. १७) घेतली. मात्र, रक्कम स्वीकारुनही ग्रामसेवकाने माहिती देण्यास टाळाटाळ सुरु केली. रक्कम भरुनही कागदपत्रे न मिळाल्याने दराडे यांनी बार्शी पंचायत समितीकडे प्रथम अपील केले. यावर १३ जानेवारी २०२६ रोजी सहायक गटविकास अधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी दीपक साळुंखे पांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीअंती २६ जानेवारी २०२६ रोजी अपिलीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश दिले की, “ग्रामसेवकाने अर्जदाराला उर्वरित सर्व माहिती आदेशाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत मोफत पुरवावी.” मात्र, पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या कायदेशीर आदेशालाही ग्रामसेवक रामेश्वर चौरे यांनी जुमानले नाही. आजतागायत कोणतीही माहिती दराडे यांना उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही.
या प्रकरणी दराडे यांनी थेट आरोप केला आहे की, भालगाव ग्रामपंचायतीत माजी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगनमताने कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. खोटी बिले काढणे, एकाच कामाची दुबार बिले काढणे, आणि न झालेल्या पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या कामांचा निधी हडप करणे असे प्रकार झाले आहेत. ही माहिती कागदोपत्री समोर आल्यास आपले पितळ उघडे पडेल आणि कारवाईला सामोरे जावे लागेल, याच भीतीने ग्रामसेवक माहिती देण्यास नकार देत आहेत.
देवदत्त दराडे – माजी सैनिक भालगाव उपोषण करते
कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने आम्ही गावात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत शासनाच्या पैशाचा होत असलेला गैरव्यवहार याबाबत प्रशासनाला माहिती विचारत आहोत. मात्र प्रशासन कोणतीही माहिती देत नाही. याला ग्रामसेवक रामेश्वर चौरे, पंचायत समितीचे अभियंता आणि अधिकारी जबाबदार आहे. यामुळे गटविकास अधिकारी यांच्यावर
कोणतेही कारवाई करत नाही म्हणून उपोषणाला बसलो होतो. आज लेखी आश्वासन दिलं आहे. सात दिवसात कार्यवाही नाही झाली तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
Post Views: 13