पंढरपूर – श्री विठुरायाच्या दर्शनासाठी येथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉरिडॉरच्या आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, हा आराखडा नगराध्यक्ष, नगरसेवक व नागरिकांना दाखविण्यात आला नव्हता. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे आता गुरुवारी (९ जुलै) पंढरपूर नगरपरिषदेमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख कॉरिडॉरचा आराखडा सादर करणार असून, कॉरिडॉर कोणत्या पद्धतीने करण्यात येणार आहे, याची माहिती केवळ नगरसेवकांना देणार आहेत.
पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासनाने उज्जैन व वाराणसीच्या धर्तीवर पंढरपुरात कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉरिडॉरच्या आराखड्यास शासनाने मंजुरी दिली असून, कॉरिडॉरसाठी सुमारे ४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रशासनाने कॉरिडॉरचा आराखडा तयार केला असून, या आराखड्यास शिखर समिती व शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आषाढी यात्रा झाल्यानंतर कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात होणार आहे.
कॉरिडॉरचा आराखडा नगराध्यक्ष, नगरसेवकांना व मालमत्ताधारकांना दाखविण्यात आला नव्हता. त्यामुळे तो दाखविण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. याची दखल घेऊन गेल्या आठवड्यात हा आराखडा केवळ नगरसेवकांना दाखविण्यात येणार होता. मात्र, जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन व उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख बैठकीसाठी मुंबई येथे गेल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता ही बैठक गुरुवारी (९ जुलै) आयोजिण्यात आलेली आहे.
नगर परिषदेमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख कॉरिडॉरच्या आराखड्याबाबत केवळ नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना माहिती देणार आहेत. त्यामुळे आराखडा नेमका कशाप्रकारे आहे याची माहिती सुरुवातील केवळ नगरसेवकांनाच मिळणार आहे.
——————-
चौकट : ( पुण्या,मुंबईचे दर पंढरपूरात )
कॉरिडॉर होणार ही काळया दगडावरील पांढरी रेघ असल्याने शहरातील मालमत्ता तसेच उपनगरातील फ्लॅट्स आणि ओपन प्लॉट्सच्या किंमती गगनाला भिडल्या असून पुण्या मुंबईचा दर सध्या पंढरपुरात सुरू आहे.
Post Views: 5