मोडनिंब – (ता. माढा) शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, विद्यार्थी तसेच लहान मोठे व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ऐन पावसाळ्यात सलग अनेक तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.मागील काही दिवस अनेक भागांत वारंवार वीज खंडित झाली. काही ठिकाणी तब्बल आठ ते दहा तास वीज नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. विशेषतः सायंकाळ व रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत असून, उकाड्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.सततच्या वीज खंडितीमुळे घरगुती कामे, व्यापारी, व्यवहार, छोटे उद्योग तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. वारंवार होणाऱ्या वीज ये-जा मुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, महावितरणचे कार्यालय शहरात स्थलांतरित करावे, तक्रारींना तत्काळ प्रतिसाद द्यावा तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांचा संयम सुटत असून, लवकरात लवकर ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मौजे मोडनिंब या गावात गावठाण फिडर हा शेटफळ उपकेंद्रातून असून सदर उपकेंद्रावर लोड जास्त असल्यामुळे ते गावठाण फिटरला लोड शेडिंग करत होते . त्यामुळे लोड कमी करण्यासाठी गावातील काही ट्रान्सफॉर्मर सोलंकरवाडी उपकेंद्रावर जोडलेले आहेत . मंगळवारी सदर 33 केवी टेंभुर्णी हून येणारे लाईन फॉल्टी झाल्यामुळे काही काळ तो फिडर बंद होता. व आज बुधवार असल्यामुळे लाईन मेंटेनन्स करण्यासाठी टेंभुर्णीतून बंद केलेला होता सदर लाईनचा मेंटेनन्स पूर्ण केलेला आहे त्यामुळे सदर लाईन व्यवस्थित चालू राहील आणि विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेतली जाईल
संतोष मोहन सूळ
सहायक अभियंता
शाखा मोडनिंब
अनेक दिवसांपासून मोडनिंब शहराचा वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. याचा परिणाम व्यावसायिक, शेतकरी व अन्य गोष्टींवर होत असून याच्यावर योग्य तो मार्ग काढवा तसेच महावितरणचे कार्यालय मोडनिंब येथे स्थलांतरित करा अन्यथा तीव्र अंदोलन छेडण्यात येईल.
अॅड. विजयसिंह गिड्डे
मोडनिंब
व्यवसायासाठी सतत वीज असणे अत्यंत गरजेचे आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने डेअरी उत्पादने आणि इतर थंड पदार्थ वितळण्याचा होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. महावितरणने अखंड वीजपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.”
संभाजी काळे,
व्यावसायिक

















