सोलापूर – राज्य सरकारच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या एसआयआर (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) या राष्ट्रीय मोहिमेच्या कामात कोणतीही दिरंगाई अथवा कुचराई सहन केली जाणार नसून, नियुक्त बीएलओ म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांनी ३१ जुलैपर्यंत सर्व माहिती संकलनाचे काम पूर्ण करावे, यासाठी शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे स्पष्ट निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिले आहेत.

या राष्ट्रीय कामकाजात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा किंवा कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने विशेष नियोजन केले आहे.
यानुसार सर्व शाळांनी सकाळी ७ ते ११ या वेळेत नियमित अध्यापन व शैक्षणिक उपक्रम पूर्ण करावेत. त्यानंतर नियुक्त शिक्षकांनी दिवसभर बीएलओ म्हणून एसआयआर मोहिमेचे काम युद्धपातळीवर पार पाडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येणार नाही, तसेच राष्ट्रीय मोहिमेचे उद्दिष्टही वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना इतर शैक्षणिक कामे देऊ नयेत, असे निर्देश दिले होते. मात्र काही शाळांमध्ये अध्यापनावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षण विभागाने सकाळी अध्यापन आणि त्यानंतर बीएलओ कामकाज असा समन्वयाचा मार्ग स्वीकारला आहे.
कोट
राष्ट्रीय मोहिमेतही उत्कृष्ट कामगिरी करावी – नशिक्षणाधिकारी जगताप
३१ जुलैपर्यंत सर्व माहिती संकलित करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्याने एसआयआर राष्ट्रीय मोहिमेतही उत्कृष्ट कामगिरी करावी, यासाठी सर्व शिक्षकांनी जबाबदारीने आणि समन्वयाने काम करावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले.
चौकट
अन्यथा शासन नियमानुसार कारवाई करणार
आजच्या टीईटी परीक्षेच्या विरोधात समन्वय समितीच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांवर शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. परंतु शिक्षकांनी या आंदोलनात सहभागी न होता, अध्यापनाचे तसेच सर मोहिमेचे कामकाज पूर्ण करावे असे आवाहन जगताप यांनी केले आहे.