जेऊर – श्री शिवछत्रपती बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, गौंडरे संचलित डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गौतम विष्णू सांगडे आणि सहशिक्षक दिलीप श्रीरंगमोडे यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवापूर्तीचा सत्कार सोहळा गौंडरे फाटा येथील साईप्रेम मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक आमदार तथा शिक्षक नेते प्रा. दत्तात्रय सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेशराव करे-पाटील होते. गौंडरे पंचक्रोशीतील नागरिक, विविध शाळांतील शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती होती.
गौतम सांगडे आणि दिलीप श्रीरंगमोडे यांनी सुमारे २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक आणि भौतिक प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत त्यांनी शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
क्रीडा क्षेत्रातही विद्यालयाने तालुका आणि जिल्हास्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक शिक्षण प्रणाली, तंत्रज्ञानाधारित अध्यापन पद्धती आणि विद्यार्थिकेंद्रित उपक्रमांचा शाळेत प्रभावीपणे वापर करण्यात सांगडे आणि श्रीरंगमोडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. त्यांच्या कार्यकाळात विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेसह व्यवस्थापन आणि संस्कारक्षम शिक्षणातही लक्षणीय प्रगती केली.
या वेळी करमाळा तालुक्याच्या वतीने आणि यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेकडून सांगडे व रणमोडे यांना मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. करे-पाटील यांनी दोन्ही शिक्षकांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि विद्यार्थिनिष्ठ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
शिक्षक सेवेतून निवृत्त झाला, तरी त्याने विद्यार्थ्यांच्या मनात रुजवलेले संस्कार, ज्ञान आणि मूल्ये कधीही निवृत्त होत नाहीत. सांगडे आणि श्रीरंगमोडे यांनी विद्यालयाकडे केवळ नोकरीचे ठिकाण म्हणून न पाहता आपले कुटुंब मानून काम केले. त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांच्या यशातून त्यांचे कार्य भविष्यातही बोलत राहील, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
दोन्ही शिक्षकांच्या प्रदीर्घ सेवाप्रवासात सांगडे मॅडम आणि रणमोडे मॅडम यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला दिलेल्या पाठबळाचाही विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांच्या निःशब्द त्यागामुळेच दोन्ही शिक्षकांना आपले कार्य अधिक प्रभावीपणे करता आले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अरविंद श्रीरंग रणमोडे, उपाध्यक्ष दत्तात्रय अजिनाथ कापले, सचिव दिनकर विष्णू सांगडे, संचालक महादेव भागवत गायकवाड, पोपट अजिनाथ कापले, अर्जुन शंकर ननवरे आणि रामकृष्ण बाबुराव खंडागळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात सांगडे आणि श्रीरंगमोडे यांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देण्यात आला. माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक आणि ग्रामस्थांनी त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्याने वातावरण भावुक झाले. दोन्ही शिक्षकांना निरोगी, आनंदी आणि समाजोपयोगी भावी आयुष्यासाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 13