धाराशिव – तालुक्यातील महाळंगी येथे दोन व्यक्तींनी वीट भट्टीसाठी अनाधिकृतपणे विना परवानगी, विना रॉयल्टी मातीचा साठा केला आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धाराशिव येथील चंद्रकांत रंगनाथ काकडे यांनी एका निवेदनाद्वारे धाराशिव तहसिलदार यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव तालुक्यातील महाळंगी येथील गट क्र. १३६ मध्ये प्रशांत बिभिषण साळुंके व प्रकाश विभिषण साळुंके यांच्या मालकीची विटभट्टी आहे. त्या विटभट्टीसाठी लागणारी माती ही अनाधिकृतपणे कोणत्याही कार्यालयाची परवानगी न घेता अंदाजे १०० टिप्पर जमा केलेली आहे. ती माती जमा करण्यासाठी त्या विटभट्टीसाठी लागणाऱ्या मातीची कसल्याही प्रकारची रॉयल्टी भरलेली नाही. त्यामुळे त्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे. प्रशांत बिभीषण साळुंके हा विटभट्टी संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून शासकीय मालमत्तेचे नुकसान करत आहे. त्यामुळे साळुंके यांच्या विरूध्द योग्य कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर वरील झालेल्या नुकसानीची दंड रक्कम वसुल करण्यात यावी, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.




















