सोलापूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूरने व्यापक नियोजन केले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सभापती यांचा पालखी मार्गावरील संयुक्त पाहणी दौरा आज बुधवार (दि. १५) आयोजित करण्यात आला असून, या दौऱ्यात माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यात विविध विभागांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिली.
दौऱ्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांना सकाळी ८.३० वाजेपर्यंत धर्मपुरी येथे आवश्यक अभिलेखे, माहिती व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाहणीदरम्यान विभागनिहाय करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार पाहणी दौऱ्याची सुरुवात माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथून होणार आहे. पालखी मार्गावरील विविध ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा, तात्पुरत्या सुविधा, रस्ते, निवारा आदी व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाणार आहे.
दौऱ्यास सर्व विभागप्रमुखांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीत अनुपस्थित राहू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवून वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांची गुणवत्ता आणि तयारीची प्रत्यक्ष खातरजमा करण्यावर या पाहणी दौऱ्याचा भर असणार आहे.
कोट
आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याची पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या जाणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी स्पष्ट केले आहे.