सोलापूर : त्रिमूर्ती नगर येथील १८ मीटर रुंदीच्या विकास आराखड्यातील (डीपी) मुख्य रस्त्यावर तसेच शासकीय जागेवर अतिक्रमण करून नागरिकांची ये-जा बंद करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्रिमूर्ती नगर प्लॉटधारक सामाजिक संस्थेने केला. या प्रकरणी तातडीने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष उमेश लोलगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
आदित्य नगर एमएसईबी उपकेंद्रालगत असलेला १८ मीटर डीपी रस्ता हा त्रिमूर्ती नगर, मेरा भारत महान नगर, साई होम्स, साई श्रद्धा अपार्टमेंट, श्री राधे अपार्टमेंट, निर्माण गॅलेक्सी अपार्टमेंट तसेच चौडेश्वरी मंदिर परिसरातील नागरिकांसाठी प्रमुख संपर्कमार्ग आहे. मात्र चौडेश्वरी मंदिर ते साई होम्सदरम्यान उर्वरित रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
याशिवाय सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय जागेवर अतिक्रमण झाल्याचा आरोपही करण्यात आला. त्रिमूर्ती नगरमधील सार्वजनिक बगीच्यातील दोन मोठी झाडे तोडून तेथे अनधिकृत खोली बांधण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि एमएसईडीसीएलच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना अतिक्रमण हटविणे व अनधिकृत वीजजोडणी तोडण्याबाबत पत्रव्यवहार केल्याचे सांगितले.
या संदर्भात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, एमएसईडीसीएलचे मुख्य कार्यकारी अभियंता तसेच सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे निवेदने सादर करण्यात आली असून, संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करून नागरिकांसाठी मुख्य रस्ता खुला करावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
===================
Post Views: 16