सोलापूर – जागतिक कराटे महासंघाशी संलग्न असलेल्या ‘जपान कराटे-डो शुडोकान आंतरराष्ट्रीय मुख्यालय (जपान)’ मान्यताप्राप्त ‘भारतीय शुडोकान कराटे’च्या उपाध्यक्षपदी महाराष्ट्राचे प्रमुख भीमराव बाळगे यांची निवड करण्यात आली. भारतीय शुडोकान कराटेचे प्रमुख मजहर खान (दिल्ली) यांनी अधिकृत पत्राद्वारे या निवडीची घोषणा केली आहे.

भीमराव बाळगे हे गेल्या ३५ वर्षांपासून सोलापूर शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विविध भागांत कराटे, किकबॉक्सिंग, सिकई, बुडो मार्शल आर्ट, युनिफाईट आणि बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांचे मुला-मुलींना दर्जेदार प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदकांसह उल्लेखनीय प्राविण्य मिळविले आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे सोलापुरात यशस्वी आयोजनही करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या याच बहुमूल्य योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवरील या प्रतिष्ठेच्या पदावर त्यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा ॲमेचुअर स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष महादेव चाकोते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, राज्य किकबॉक्सिंग उपाध्यक्ष मनीष सुरवसे, उद्योजक मुकुंदराव जाधव, मनपा क्रीडा अधिकारी नजीर शेख, माजी क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव, सुधीर लांडे, सागर कत्ते, सुरेश माळगे, अनुजा कुलकर्णी, शिवकुमार पाटील, सुरेश पवार, रमेश बसाटे, गुरुराज कुलकर्णी यांच्यासह क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भीमराव बाळगे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





















