माढा : खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्या माढा दौऱ्यादरम्यान प्रवासी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने त्यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत माढा शहर व परिसरातील गावांच्या दळणवळणाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पंडित यांनी प्रामुख्याने माढा रेल्वे स्थानकात सोलापूर-पुणे-हुतात्मा एक्स्प्रेस आणि मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. माढा स्थानकाचे प्रतिमाही बुकिंग व तिकीट कलेक्शन किमान दहा लाख रुपये असून, या गाड्यांना थांबा मिळाल्यास माढ्यासह परिसरातील ३० गावांतील प्रवाशांना त्याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तसेच माढा बसस्थानक बीओटी तत्त्वावर देऊन स्थानकाची सुधारणा व व्यापारी संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय पंढरपूर-माढा-तुळजापूर, टेंभूर्णी-माढा, अक्कलकोट-माढा-शिर्डी या मार्गांवर बस सेवा सुरू करण्याबाबतही निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या की, हा प्रश्न रेल्वे मंत्री व पुणे बोर्डाच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. वेळोवेळी पाठपुरावा करून हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असून, सामान्य जनतेच्या प्रश्नांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
या बैठकीला प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पंडित, शरद घोलप, संतोष साठे, श्रीनिवास अपराजित, महेश घोलप, वल्लभ कुलकर्णी, राजू साठे, प्रीतम शिंदे, प्रवीण चवरे, सोहम साठे, उदय सोनार, आदेश मेहता व वर्धमान उपाध्ये उपस्थित होते.