सोलापूर : सोशल आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय, सोलापूर आणि उर्दू लिटरेरी फोरम, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात भव्य साहित्य संमेलन, मुशायरा (काव्यवाचन) आणि पीएच.डी. संशोधकांचा गौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शहरातील साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि उर्दूप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात अर्शिया शेख यांनी पवित्र कुरआन पठणाने केली. स्वागतपर भाषणात डॉ. आसिफ इक्बाल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. साहित्य, संशोधन आणि शिक्षणाचा प्रसार ही काळाची गरज असून अशा कार्यक्रमांमुळे समाजात बौद्धिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. गौस अहमद शेख यांनी प्रमुख पाहुणे तथा महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे अध्यक्ष सय्यद हसीन अख्तर यांचा परिचय करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इक्बाल तांबोळी यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.
अध्यक्षीय भाषणात हसीन अख्तर म्हणाले, “सोलापूरची भूमी उर्दू भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी अत्यंत सुपीक आहे. येथील साहित्यिक परंपरा समृद्ध असून शैक्षणिक संस्थांमध्ये होणारे साहित्यिक उपक्रम नव्या पिढीला संशोधन, सर्जनशीलता आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा देतात.”
यानंतर ‘बझ्म-ए-गालिब, सोलापूर’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी बशीर परवाझ यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या मुशायरात मीर अफझल मीर, अब्दुल शुकूर ‘शऊर’, वजाहत अब्दुस सत्तार, युसूफ शेख, शादा पितापुरी, डॉ. आसिफ इक्बाल यांच्यासह अनेक कवींनी आपल्या निवडक रचना सादर करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
यावेळी सोलापूर शहरातील विविध क्षेत्रांत पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या संशोधकांचा विशेष सत्कार प्रमुख पाहुणे हुसेन अख्तर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. यामध्ये डॉ. इक्बाल धोटेघर, डॉ. नाझिया चंडर्गी, डॉ. मसरूर जहाँ, डॉ. समीना सय्यद, डॉ. अब्दुर राफे नांदेड, डॉ. सुमय्या बागबान, डॉ. यास्मिन शेख, डॉ. वड्डू तस्नीम, डॉ. आयेशा पठाण, डॉ. एस. ए. बीजापुरे, डॉ. एहतेशाम अहमद नदाफ आणि डॉ. गौस अहमद शेख यांचा समावेश होता.
प्राचार्य डॉ. इक्बाल तांबोळी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत समाजात साहित्य, संशोधन आणि शैक्षणिक जागरूकता वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गौस अहमद शेख यांनी केले, तर मुशायराचे सूत्रसंचालन डॉ. ए. ए. बीजापुरे यांनी केले. शेवटी डॉ. वड्डू तस्नीम यांनी आभार मानले.
*बॉक्स न्यूज*
*पीएच.डी. संशोधकांचा गौरव*
समारंभात डॉ. इक्बाल धोटेघर, डॉ. नाझिया चंडर्गी, डॉ. मसरूर जहाँ, डॉ. समीना सय्यद, डॉ. अब्दुर राफे नांदेड, डॉ. सुमय्या बागबान, डॉ. यास्मिन शेख, डॉ. वड्डू तस्नीम, डॉ. आयेशा पठाण, डॉ. एस. ए. बीजापुरे, डॉ. एहतेशाम अहमद नदाफ आणि डॉ. गौस अहमद शेख यांचा प्रमुख पाहुणे हसीन अख्तर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.