सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव (सोलापूर) येथे २७ व २८ जुलै २०२६ रोजी “International Conference on AI-Driven Materials, Energy and Smart Technologies (AIMEST-2026)” या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ शंकर नवले यांनी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आधारित संशोधन, प्रगत मटेरियल, शाश्वत ऊर्जा आणि स्मार्ट तंत्रज्ञान या क्षेत्रांतील नव्या संशोधनाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर तथा संस्थेचे सचिव संजय नवले हे राहणार असून, माजी कुलगुरू तथा सिंहगड सीआरटीडीचे संशोधन संचालक डॉ. एस. एच. पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. अजय कुमार द्विवेदी (Senior Member, IEEE तथा Professor, Cambridge Institute of Technology, Bengaluru) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
परिषदेत देश-विदेशातील नामवंत संशोधक, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच विद्यार्थी सहभागी होऊन आपले संशोधनपर शोधनिबंध सादर करणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, ऊर्जा व्यवस्थापन, प्रगत मटेरियल, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), रोबोटिक्स, शाश्वत तंत्रज्ञान तसेच उदयोन्मुख अभियांत्रिकी संशोधन या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने, तांत्रिक सत्रे आणि संशोधन निबंधांचे सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे.
परिषदेत सादर होणाऱ्या उत्कृष्ट संशोधन निबंधांना ‘Best Paper Award’ प्रदान करण्यात येणार असून, सर्व सहभागी संशोधकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. या परिषदेमुळे संशोधक, उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण होऊन भविष्यातील संशोधनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ. एस. एस. शिरगण हे असून, परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्राध्यापक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या परिषदेत संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Post Views: 38