पंढरपूर – आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी भाविकांची पंढरपूरात मांदियाळी दिसत आहे. मंदिर परिसरात असलेल्या प्रासादिक साहित्याच्या दुकानांतून प्रासादिक साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी होवू लागली आहे. आषाढी यात्रेच्या काळात प्रासादिक साहित्याच्या विक्रीतून पंढरपूरात मोठी उलाढाल होत असते.
यावर्षी सुरुवातीला जरी पावसाने ओढ दिली असली तरी नंतरच्या काळात वरुणराजा सध्या दमदार बँटींग करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा काही प्रमाणात पल्लवीत झालेल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विठुरायावर हवाला ठेवीत वारी कदापि चुकवू द्यावयाची नाही या वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनसरुन आषाढी यात्रेसाठी मोठ्या संख्येने वारकरी येथे दाखल होवू लागलेले आहेत. या वर्षीच्या यात्रेसाठी ३० लाखांहून अधिक वारकरी हजेरी लावतील असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वर्तविला आहे. प्रशासनाने देखील २० ते २५ लाख भाविकांची उपस्थिती राहिल हे गृहित धरुन यात्रेची तयारी केलेली आहे.
आषाढी यात्रेला राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आदी राज्यांतून सुमारे वीस लाखांहून अधिक भाविक दाखल होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे आषाढी यात्रेत प्रासादिक साहित्याला मोठी मागणी असणार आहे. गावी परत जाताना प्रसाद म्हणून बुक्का, पेढे, अगरबत्ती, नारळ, हार, कुंकू, हळद, टाळ, पखवाज, वीणा, देवाच्या मूत्रों, लहान मुलांची खेळणी आदी साहित्यांची मागणी भाविक करत असतात.
सध्या श्री विठ्ठल मंदिरा भोवताली प्रासादिक साहित्यांची दुकाने विविध प्रकारच्या प्रासादिक वस्तूच्या मालाने फुललेली दिसत आहेत.
त्याचबरोबर शहरातील चौफाळा, छत्रपती
शिवाजीमहाराज चौक, स्टेशन रोड, नगरप्रदक्षिणा रस्ता,नाथ चौक, हरिदास वेस, तांबडा मारती, कालिकादेवी चौक, काळा मारती आदी ठिकाणी प्रसाद, टाळ व पखवाजाची दुकाने आहेत. बुक्का, कुंकू, चुरमुरे, कांडे साखर, बत्तासे साखर, साखर फुटाणे आदी खरेदी करण्यासाठी भाविकांची गदाँ होत आहे.
————————–
चौकट : (आषाढी वारीत ५०० कोटी उलाढालीचा अंदाज )
वर्षातील सर्वात मोठी आषाढी वारी पंढरी नगरीमध्ये भरत असते. या आषाढी वारीला संपूर्ण बाजारपेठ फुललेली आहे. या छोट्या-मोठ्या व्यवसायांतून जवळपास अंदाजे पाचशे कोटींच्या वर उलाढाल होत असते. यंदाही त्याच शक्यतेने या वारीत मोठ्या प्रमाणात पंढरपूर शहरातील आणि बाहेरचे व्यापारी आपली दुकाने मांडली आहेत.
———————
कोट
आषाढी वारीला भाविकांची सध्या मोठी गर्दी आहे. यामुळे भाविकांची मोठी मागणी प्रसाद साहित्याला असते. संपूर्ण प्रसाद पॅक करून दुकानात मांडणी केली आहे. जेणेकरून भाविकांना सर्व साहित्य पाहायला मिळते जाणि विक्रीही लवकर होते. पेढा, चुरमुरे, साखर फुटाणे, कांडे बत्तासे, बुक्का, कुंकू, अगरबत्ती, टाळ, तुळशी माळा, चंदनाचा गंध या साहित्यांना भाविकांची प्रचंड मागणी असते. त्यामुळे त्याची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते.
राजेंद्र खंडागळे ( प्रासादिक साहित्य विक्रेता )
Post Views: 22