सोलापूर : वाढते शहरीकरण, ऊर्जा वापर, पाण्याची टंचाई, वायू प्रदूषण आणि वाढते तापमान या समस्यांवर पर्यावरणपूरक व शाश्वत बांधकाम हा प्रभावी उपाय मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका स्थायी समितीने शहरात ग्रीन बिल्डिंग संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र प्राप्त इमारतींना मिळकत करात १० टक्के सवलत देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
शहरात पर्यावरणपूरक व हरित इमारतींचा प्रसार व्हावा, ऊर्जा व पाण्याची बचत व्हावी तसेच प्रदूषणात घट व्हावी, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. या सवलतीमुळे नागरिकांना पर्यावरणस्नेही बांधकामाकडे वळण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. ग्रीन बिल्डिंग कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी इमारतींनी निश्चित करण्यात आलेल्या सात निकषांची पूर्तता करणे आवश्यक राहणार आहे. त्यामध्ये सौर ऊर्जा, नैसर्गिक वायुवीजन व एलईडी दिव्यांच्या माध्यमातून ऊर्जा बचत, वर्षा जलसंधारण व जलपुनर्भरण व्यवस्था, पर्यावरणपूरक व टिकाऊ बांधकाम साहित्याचा वापर, कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, नैसर्गिक प्रकाशाचा अधिकाधिक वापर, गच्चीवरील बाग व परिसरात वृक्षारोपणाद्वारे जैवविविधतेला प्रोत्साहन तसेच प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक वाहनांचा वापर या बाबींचा समावेश आहे.
या सवलतीसाठी मिळकतधारकांनी मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राप्त वैध ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. ही सवलत नवीन तसेच नूतनीकरण केलेल्या जुन्या इमारतींनाही लागू राहणार आहे.
शहराच्या पर्यावरणीय गुणवत्ता निर्देशांकात
सुधारणा होईल : रंजिता चाकोते
स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते म्हणाल्या, या निकषांची पूर्तता करणाऱ्या मिळकतधारकांनी मान्यताप्राप्त संस्थेकडील वैध ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ही सवलत नवीन तसेच नूतनीकरण केलेल्या जुन्या इमारतींनाही लागू राहील. नागरिकांनी ग्रीन बिल्डिंगकडे कल वाढविल्यास शहराच्या पर्यावरणीय गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होईल. ऊर्जा व पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल, पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल, शाश्वत शहरी विकासाला चालना मिळेल तसेच स्वच्छ भारत अभियान व हरित शहर अभियानासही हातभार लागेल.
या सात निकषांची पूर्तता आवश्यक
– सौर ऊर्जा, नैसर्गिक वायुवीजन, एलईडी दिवे आदींचा वापर.
– वर्षा जलसंधारण व जलपुनर्भरण प्रणाली.
– पर्यावरणपूरक, कमी प्रदूषण करणारे व टिकाऊ बांधकाम साहित्य.
– कचऱ्याचे व्यवस्थापन व पुनर्वापर.
– नैसर्गिक प्रकाशाचा प्रभावी वापर.
– गच्चीवरील बाग व परिसरात वृक्षारोपण करून जैवविविधतेला प्रोत्साहन.
– प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक वाहनांचा वापर.
Post Views: 10