सोलापूर :आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो भीमसैनिक, विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलनात सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, जालन्यातील रुक्मिणी लोंढे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कृती समितीच्या वतीने राज्य सरकारवर टीका करत अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरण लागू करण्याचा प्रयत्न असंवैधानिक असल्याचा आरोप करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या अभिप्रायाचा राजकीय गैरवापर होत असल्याचा दावा करत बदर समितीचा अहवाल तात्काळ जाहीर करावा आणि उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातींना एकसंध ठेवण्यासाठी दिलेल्या विचारांना धक्का पोहोचविणारे ‘अ, ब, क, ड’ वर्गीकरण स्वीकारले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. आंदोलनादरम्यान संपूर्ण परिसर निळ्या झेंड्यांनी आणि “आरक्षण वाचवा, संविधान वाचवा” या फलकानी लक्ष वेधून घेतले.”जय भीम… जय भीम…”, “आरक्षण वाचवा, संविधान वाचवा”, “उपवर्गीकरण रद्द करा” अशा घोषणांनी सोमवारी (दि. 27) सोलापूर शहर दणाणून गेले.
या आंदोलनाला विविध समाजाने जाहीर पाठिंबा दिला. समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. विविध सामाजिक संस्था आणि आंबेडकरी संघटनांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थिती लावत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
दरम्यान, सकाळी दहापासूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात आंदोलक जमा होऊ लागले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. तब्बल अडीच ते तीन तास चाललेल्या या मोर्चाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जि. प. पूनम गेट हा संपूर्ण मार्ग व्यापला. शहरासह जिल्ह्यातील विविध तालुके व गावांमधून आलेले हजारो भीमसैनिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले. जि. प. पूनम गेट येथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी शासनाने अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कृती समितीच्या नेत्यांनी दिला.
यावेळी सुभानजी बनसोडे, जनार्दन शिंदे, अशोक जानराव, ॲड. संजीव सदाफुले, देवा उघडे, बबलू गायकवाड, राजा सोनकांबळे, अमित कांबळे, अतिश बनसोडे, श्याम क्षीरसागर, विनोद इंगळे, प्रवीण कांबळे, कुमार चन्ना, सुहास सावंत यांच्यासह अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो समाजबांधव उपस्थित होते.
सरसेनानी आनंदराज आंबेडकर
चारचाकी वाहनात उभे राहून अभिवादन
मोर्चाच्या मध्यभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर चारचाकी वाहनात उभे राहून आंदोलकांना अभिवादन करत होते. त्यांच्या उपस्थितीमुळे भीमसैनिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.
‘या’ आहेत प्रमुख मागण्या
– न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल व सांख्यिकीय डेटा तात्काळ जाहीर करावा.
– उपवर्गीकरण रद्द करा. असंवैधानिक उपवर्गीकरणाचे धोरण त्वरित मागे घ्यावे.
– एससी/एसटी उपयोजनेचा निधी सुरक्षित ठेवण्यासाठी आगामी अधिवेशनात वैधानिक कायदा मंजूर करावा.
– शासन जमा झालेल्या एससी-एसटी शेतकऱ्यांच्या जमिनी मूळ वारसांच्या नावे २० दिवसांत परत करून तेथे रस्ता, वीज व सिंचनाची सोय करावी.
– कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेतील अनुदान प्रति एकर किमान २५ ते ३० लाख रुपये करून अटी शिथिल कराव्यात
Post Views: 4