सोलापूर : शहरातील महानगरपालिकेच्या मालकीची अनेक समाजमंदिरे बंद अवस्थेत असून काही डागडुजीअभावी जीर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने अशा समाजमंदिरांची यादी तयार करून त्यांचे टप्प्याटप्प्याने नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजमंदिरे हायटेक सुविधांनी सुसज्ज करून नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करण्याची तयारी सुरू आहे.
महानगरपालिकेच्या समाजमंदिरांपैकी अनेक इमारतींची योग्य देखभाल होत नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. काही बंद समाजमंदिरांमध्ये मद्यप्राशन व इतर गैरवापर प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी असून त्यामुळे परिसरातील सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. काही समाजमंदिरे खाजगी तत्त्वावर भाड्याने देण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी कराराची मुदत संपूनही संबंधित व्यक्तींचा ताबा कायम असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व समाजमंदिरे व सभागृहांचे प्रशासकीय आणि भौतिक ऑडिट करण्याची मागणी अनेक नगरसेवकांनी केली आहे. ज्या संस्था अथवा व्यक्तींच्या कराराची मुदत संपली आहे, त्यांच्याकडून जागांचा तातडीने ताबा घेऊन त्या पुन्हा महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली आणाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. देखभालीअभावी सरकारी मालमत्तेचे नुकसान होत असल्याने या इमारतींच्या जिर्णोद्धाराला प्राधान्य देण्यात येणार आहे.
शहरात ७४ समाजमंदिरे, ३४ अभ्यासिका
शहरात महानगरपालिकेची एकूण ७४ समाजमंदिरे आणि ३४ अभ्यासिका आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक समाजमंदिरे बंद अवस्थेत आहेत. मात्र अभ्यासिका सुस्थितीत असून त्यांनाही आधुनिक व हायटेक सुविधांनी सुसज्ज करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
समाजमंदिरांचा असा होऊ शकतो उपयोग
समाजमंदिरांच्या मोकळ्या जागांचा वापर परिसरातील तरुणांसाठी व्यायामशाळा, महिलांसाठी शिवणकला केंद्र तसेच विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यासाठी करता येऊ शकतो. या उपक्रमांची जबाबदारी स्थानिक महिला बचत गट किंवा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांकडे दिल्यास रोजगारनिर्मितीलाही चालना मिळू शकते.
—