सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील जवाहरलाल नेहरू वसतीगृहातील गाळे क्रमांक १ ते १७ च्या भाडेवसुलीचा आढावा घेतल्यानंतर तब्बल ३० लाख १७ हजार ६७९ इतकी थकबाकी असल्याचे वास्तव समोर आले आहे.
नेहरू वसतीगृहाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या गाळेभाड्याची मोठी रक्कम अद्याप वसूल न झाल्याने देखभाल, दुरुस्ती आणि इतर मूलभूत सुविधांवरील खर्चाचे नियोजन अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे थकीत भाडे तातडीने वसूल करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
भाडे थकबाकीबरोबरच वसतीगृहाच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्चही वाढत आहे. वसतीगृह व्यवस्थापन, दुरुस्ती, सुधारणा, पाणीपट्टी आणि वीजबिलासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. केवळ वीजबिलासाठीच दरमहा सुमारे २५ हजार ५० इतका खर्च होत असून वर्षाकाठी सुमारे ३ लाख खर्च केला जातो. तर महापालिकेला पाणीपट्टीसाठी सुमारे ६ लाख ८५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत भाडे वेळेत वसूल होणे आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, यापुढे थकबाकीदारांना नोटिसा देणे, थकीत रक्कम भरण्यासाठी मुदत देणे आणि त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास नियमांनुसार पुढील कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. वसतीगृहाच्या उत्पन्नातूनच दैनंदिन देखभाल, आवश्यक दुरुस्ती आणि सुविधा पुरवल्या जात असल्याने थकबाकीची समस्या लवकरात लवकर मार्गी लावणे गरजेचे बनले आहे.
चौकट
थकबाकीदारांमध्ये यांचा समावेश
विजय प्रताप युवा मंच (गाळा क्र. १७) यांच्याकडे सर्वाधिक १० लाख ५७ हजार ६६६ इतकी रक्कम बाकी आहे. त्यानंतर बी. आर. म्हमाणे (गाळा क्र. १६) यांच्याकडे ७ लाख ११ हजार २३९, शाम क्षिरसागर (गाळा क्र. ११) यांच्याकडे ३ लाख ३४ हजार ९४२, जनसेवा संघटना (गाळा क्र. १२) यांच्याकडे २ लाख ६६ हजार ३७४, संदीप पोपटलाल गांधी (गाळा क्र. ८) यांच्याकडे २ लाख ४७ हजार ८२१ आणि पोस्ट ऑफिस (गाळा क्र. ४) यांच्याकडे २ लाख ३३ हजार ४८९ इतकी थकबाकी असल्याची नोंद आहे. काही गाळेधारकांनी संपूर्ण भाडे भरले असून काहींकडे किरकोळ जादा रक्कम जमा झाल्याचेही नोंदीत दिसून येते.
चौकट
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाच्या उपलब्ध गोषवाऱ्यानुसार, १ ऑगस्ट २०२३ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत गाळ्यांकडून १ कोटी ४२ लाख ३० हजार ९२९ इतके भाडे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात १ कोटी १२ लाख १३ हजार २५० इतकीच रक्कम जमा झाली असून ३० लाख १७ हजार ६७९ इतकी थकबाकी शिल्लक आहे.
कोट
वसतीगृहाचा निधी हा वसतीगृहाच्या सुविधांसाठीच वापरला जाणार
जवाहरलाल नेहरू वसतीगृह हे जिल्हा परिषदेची महत्त्वाची मालमत्ता आहे. गाळेधारकांनी नियमानुसार व वेळेत भाडे भरणे ही त्यांची जबाबदारी आहे. थकीत भाड्यामुळे वसतीगृहाच्या देखभाल व विकासकामांवर परिणाम होतो. त्यामुळे सर्व थकबाकीदारांकडून नियमानुसार भाडेवसुली केली जाईल. आवश्यक तेथे नोटिसा देऊन नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. वसतीगृहाचा निधी हा वसतीगृहाच्या सुविधांसाठीच वापरला जाणार असून आर्थिक शिस्त राखण्याला प्राधान्य दिले जाईल.
– इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती.
Post Views: 13