सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार पंढरपूर येथील इतिहास तज्ज्ञ गोपाळ देशमुख यांना जाहीर झाल्याची घोषणा कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी पत्रकार परिषदेत केली.
विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यात सोलापूर ही जन्मभूमी, कर्मभूमी व ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी पंढरपूर येथील श्री. देशमुख हे ठरले आहेत. त्यांच्या ऐतिहासिक संशोधनात्मक व साहित्यीक लेखनातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. रोख रक्कम 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
शनिवार, 1 ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा 22 वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे. सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या समारंभास मुख्य अतिथी म्हणून रासायनिक तंत्रज्ञान संस्था मुंबईचे पद्मश्री. प्रा.डॉ.गणपती दादासाहेब यादव दुरस्थ प्रणालीद्वारे आणि पुणे येथील आयकर आयुक्त डॉ.नितीन रघुनाथ वाघमोडे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याचबरोबर विद्यापीठाच्या विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते, त्यानुसार तज्ञ समितीने विविध पुरस्कारांची देखील निवड केली आहे. याही पुरस्कारांचे वितरण शनिवारी होणार आहे. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस प्र. कुलगुरु लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सीए. महादेव खराडे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, मानवविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महेश खरात, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा प्रभारी अधिष्ठाता, डॉ. शिवाजी शिंदे आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजशेखर हिरेमठ, प्रसिध्दी प्रमुख डॉ. मलिक रोकडे यांच्यासह विद्यापीठातील उपकुलसचिव, सहायक कुलसचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
—————-
इतर जाहीर ९ पुरस्कार :
* उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर.
* उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार: प्राचार्य डॉ. सत्यजीत कांतीलाल शहा, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर.
* उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ): डॉ.प्रभाकर नागनाथ कोळेकर, सामाजिकशास्त्रे संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
* उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय): प्रा.डॉ. बापू भिमा राऊत, वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर.
* उत्कृष्ट शिक्षकेत्तर अधिकारी पुरस्कार (वर्ग एक व दोन- विद्यापीठ): नशीर बशीरमियाँ देशमुख, कक्षअधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
* उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (वर्ग तीन- विद्यापीठ): ज्ञानेश्वर अर्जुंन निंबाळकर, सहायक कक्षअधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
* उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (वर्ग चार- विद्यापीठ): शिवराज माणिकराव मिटकरी, शिपाई,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
* उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (लिपिक संवर्ग- महाविद्यालय): अशोक लक्ष्मण कोरे, ग्रंथालय लिपिक,
सी.बी.खेडगीज् सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स ॲण्ड राजा जयसिंह आर्टस् कॉलेज, अक्कलकोट.
* उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (चतुर्थश्रेणी कर्मचारी- महाविद्यालय): विष्णु जयवंत वाघमारे, सेवक, वसुंधरा कला महाविद्यालय सोलापूर.
————
जीवनगौरव पुरस्कार प्राप्त गोपाळ देशमुख यांच्याविषयी…
गोपाळ मारुती देशमुख हे राजपत्रित अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी ‘गहिवर’ (ग्रामीण कथासंग्रह), ‘सोलापूर जिल्ह्याची बखर’ (ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ), ‘असे झुंजले वीर मराठे’ (मराठा कालिन लढाया), ‘मराठी दौलतीचे नारीशिल्प’ (मराठी दौलतीतील मातोश्री जिजाबाईंपासून पंधरा कर्तृत्ववान स्त्रियांचे ऐतिहासिक कार्य सांगणारा ऐतिहासिक ग्रंथ), ‘सोलापूर जिल्ह्याचा इतिहास’ (सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक घराणी, त्यांनी इतिहासातील केलेले पराक्रम व स्वराज्यासाठीचे योगदान, गावागांवाचा इतिहास, असा बृहद ऐतिहासिक संदर्भासह ७०० पृष्ठांचा सोलापूर जिल्ह्यातील एकमेव संदर्भग्रंथ), ‘दोन राजधान्या मंगळवेढा ब्रम्हपुरीचा इतिहास’ (मंगळवेढा येथील प्राचीन राजवटीचा शिवकालापर्यंतचा इतिहास, औरंगजेब बादशहाच्या चार वर्षे मुक्कामातील ब्रम्हपुरीचा इतिहास), ‘सुमेदार मल्हारराव होळकर, एक राष्ट्रपुरुष’ (गेली शंभर वर्षांनंतर मल्हारराव होळकर यांचे ऐतिहासिक कार्य विशद करणारा ग्रंथ), ‘राजे माधवराव तथा महादजी शिंदे (अलिजाबहादृर)’ (शिंदे घराण्याचा इतिहास उलगडणारा संदर्भग्रंथ),यासह विविध नियतकालिके, वृत्तपत्रे, दीपावली अंक तसेच वेगवेगळ्या मासिकांतून ऐतिहासिक विषयांवर सातत्याने लिखाण केले आहेत.
——
Post Views: 13