सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ ग्रामपंचायतीतील विकासकामांच्या बिलांबाबत गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, बदली झाल्यानंतरही अधिकार नसताना तब्बल ११ लाख रुपयांची बिले अदा केल्याप्रकरणी ग्रामसेवक गंगाधर कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या निर्देशानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
गंगाधर कांबळे हे यापूर्वी बीबीदारफळ ग्रामपंचायतीत कार्यरत होते. फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांची तेलगाव ग्रामपंचायतीत बदली झाली होती. मात्र, बदलीनंतरही त्यांनी मार्च २०२६ मध्ये बीबीदारफळ ग्रामपंचायतीच्या विकासकामांची ९ लाख व २ लाख रुपयांची अशी एकूण ११ लाख रुपयांची बिले संबंधित ठेकेदाराला अदा केल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, त्या काळात बीबीदारफळ ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने तेथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. अशा परिस्थितीत कोणताही प्रशासकीय अधिकार नसताना बिलांचा व्यवहार केल्याची बाब प्राथमिक चौकशीत समोर आली.
या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषद प्रशासनाकडे दाखल झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी चौकशीचे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांच्या अहवालात नियमबाह्यरीत्या बिलांचे भुगतान झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कांबळे यांच्याविरुद्ध तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष असलेल्या अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली असून, विकासकामांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये नियमांचे काटेकोर पालन करण्याचा प्रशासनाचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
चौकट
प्रशासनाचा इशारा
अधिकार संपल्यानंतर किंवा बदलीनंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करणे गंभीर प्रशासकीय उल्लंघन मानले जाईल. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.