सोलापूर – जिल्हा परिषद आरोग्य विभागातील प्रशासकीय बदली प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, एका आरोग्य सेवकाच्या सलग तीन प्रशासकीय बदल्यांमागे संगनमत आणि आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप वागदरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना तीन पानी निवेदन सादर करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक नागनाथ होटकर यांच्या बदली प्रकरणामुळे हा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी यापूर्वी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता प्रकरण अधिकच तापले आहे.
निवेदनानुसार, होटकर यांची प्रथम वैराग (ता. बार्शी), त्यानंतर पाटकुल (ता. मोहोळ) आणि नंतर बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे अशा सलग तीन प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. नियमांनुसार प्रशासकीय बदली एकदाच होणे अपेक्षित असताना, एका कर्मचाऱ्याच्या सोयीसाठी वारंवार आदेश बदलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तानवडे यांनी आरोग्य विभागातील तसेच सामान्य प्रशासन विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बदली प्रक्रियेत अनियमितता केल्याचा आरोप केला आहे. संबंधित नस्ती तपासणीदरम्यानही नियमांकडे दुर्लक्ष करून प्रकरण मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
विशेष म्हणजे, होटकर यांच्या नव्या बदलीचे आदेश ३१ मे २०२६ रोजी काढण्यात आल्याची नोंद आहे. मात्र त्या दिवशी रविवार असल्याने शासकीय कार्यालयाला सुट्टी होती. अशा दिवशी आदेश निर्गमित झाल्याने संपूर्ण प्रक्रियेवर संशय निर्माण झाला असून, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात आरोग्य विभाग आणि सामान्य प्रशासन विभागातील संबंधित सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्या भूमिकेची चौकशी करावी. तसेच नियमबाह्य पद्धतीने आणखी किती बदल्या करण्यात आल्या, याचाही स्वतंत्र तपास करण्यात यावा, अशी मागणी प्रवीण तानवडे यांनी केली आहे.
चौकट
प्रमुख्य मागण्या
आरोग्य विभाग व सामान्य प्रशासन विभागातील संबंधित सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे.
आरोग्य सेवक नागनाथ होटकर यांच्या तीनही प्रशासकीय बदल्यांची स्वतंत्र चौकशी करावी.
बदली प्रक्रियेत आर्थिक व्यवहार व संगनमताच्या आरोपांची सखोल चौकशी करावी.
नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या इतर बदल्यांचाही तपास करून दोषींवर कारवाई करावी.
बदली आदेशांचे पालन न करणाऱ्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करावी.
भविष्यात अशा प्रकारच्या नियमबाह्य बदल्यांना आळा घालण्यासाठी पारदर्शक यंत्रणा कार्यान्वित करावी.