मंगळवेढा – स्व. लक्ष्मीबाई (नीलाई) बाजीराव काळुंगे यांच्या स्मरणार्थ धनश्री, सिताराम व आष्टी परिवाराच्या वतीने धनश्री प्रवचनमालाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवचनमालेचे हे आठवे वर्ष असून, शुक्रवार दि.३१ जुलै ते मंगळवार दि.४ ऑगस्ट रोजी सायं. ६ ते ८ या वेळेत श्रीराम पॅलेस, श्रीराम मार्ट, शिशुविहार समोर, मंगळवेढा येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनश्री, सिताराम व आष्टी परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी दिली.
संत विचारांचा प्रसार आणि अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी या प्रवचनमालेचे आयोजन दरवर्षी भक्तिभावाने केले जाते. दरवर्षीप्रमाणे या प्रवचनमालेत संत माणकोजी महाराज बोधले यांचे अकरावे वंशज तथा संत साहित्याचे अभ्यासक, विद्यावाचस्पती ह. भ.प. डॉ. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले धामणगावकर हे संत कान्होपात्रा अभंग चिंतन या विषयावर पाच दिवस प्रवचन करणार आहेत.
मानवी जीवनामध्ये आलेल्या प्रतिकृतीला कसे सामोरे जावे याचे विचार संतांच्या अभंगात मिळतात. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत झाले. या सर्वांमध्ये मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आपल्या जीवनातील भक्तीने प्रत्यक्ष पांडुरंगाच्या जवळ कायमस्वरूपी स्थान मिळवले ती संत कान्होपात्रा होय. याच कान्होपात्राच्या अभंगातून कान्होपात्राच्या आध्यात्मिक चरित्र व त्यावरील तात्विक, सामाजिक, चिंतन आपणास ऐकायला मिळणार आहे. आपल्या मंगळवेढ्यातील संत कान्होपात्रेचा अधिकार आपल्याला या प्रवचनातून कळणार आहे. तरी मंगळवेढा व परिसरातील सर्व श्रोत्यांनी या श्रावण सुखाचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजक धनश्री सिताराम व आष्टी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 12