करकंब – पंढरपूर येथील आषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र शेगाव येथून प्रस्थान केलेल्या श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातील पहिल्या मुक्कामासाठी आलेल्या पालखीचे करकंब ता.पंढरपूर येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे पारंपरिक उत्साहात,भक्ती भावाने स्वागत करण्यात आले.पालखीचे आगमन होताच परिसर ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.ढोल-ताशांच्या गजर व टाळ-मृदंगाच्या तालावर पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी प्रशालेचे मुख्याध्यापक हेमंत कदम,स्वाती कदम या दांपत्याने पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत करून श्रींचे पूजन केले.संपूर्ण कार्यक्रमात शिस्त,नियोजन,भक्तिभाव यांचा सुंदर संगम दिसून आला.पालखीच्या दर्शनासाठी करकंब व परिसरातील हजारो भाविकांनी रामभाऊ जोशी हायस्कूलच्या मैदानात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच भक्तांनी मोठ्या श्रद्धेने श्रींचे दर्शन घेतले.परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.या मुक्कामाच्या निमित्ताने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची,निवासाची तसेच स्वच्छतेची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.स्थानिक स्वयंसेवक,शिक्षक व ग्रामस्थांनी मिळून सेवाभावी वृत्तीने काम करत सोहळा सुरळीत पार पाडला.शिस्तबद्ध नियोजन,भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती आणि भक्तिमय वातावरण यामुळे यंदाचा पालखी मुक्काम सोहळा विशेष ठरला असून करकंबकरांनी समाधान व्यक्त केले.
Post Views: 5