टेंभुर्णी – पुणे जिल्ह्यासह उजनी धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेत मोठी घट झाली आहे. दौंड येथून धरणात सध्या केवळ २९,४३७ क्युसेक्स पाण्याची आवक होत असून, काही दिवसांपूर्वीच्या तुलनेत ही आवक तब्बल ४० हजार क्युसेक्सने कमी झाली आहे. आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने येत्या तीन ते चार दिवसांत उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्गही टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेच्या नोंदीनुसार उजनी धरणाची पाणीपातळी ४९६.७९० मीटर इतकी असून धरणातील उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा ९९.१२ टक्के झाला आहे. धरणाचे जलसाठा क्षेत्र ३३५.३० चौ.कि.मी., एकूण पाणीसाठा ३३०६.५९ दशलक्ष घनमीटर (११६.७६ टीएमसी) तर उपयुक्त पाणीसाठा १५०३.७८ दशलक्ष घनमीटर (५३.१० टीएमसी) इतका नोंदविण्यात आला आहे.
धरणातील उच्च जलसाठा लक्षात घेऊन प्रशासनाने सध्या सांडव्यावरून ६०,००० क्युसेक्स आणि वीजगृहातून १,६०० क्युसेक्स, असा एकूण ६१,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात कायम ठेवला आहे. मात्र धरणात येणारी आवक सातत्याने कमी होत असल्याने पुढील काही दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन विसर्गात कपात होण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
याशिवाय सीना-माढा उपसा सिंचन योजनेस २८० क्युसेक्स, दहिगाव उपसा सिंचन योजनेस ९० क्युसेक्स, बोगद्यातून ९०० क्युसेक्स आणि मुख्य कालव्यातून २,५०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात, बंधाऱ्यांवर अथवा पुलांवर जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. पावसाची स्थिती, धरणातील आवक आणि जलसाठा यानुसार पुढील काळात विसर्गात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Post Views: 11