सांगोला – सांगोल्यातील वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थापक वामनराव शिंदे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण संस्थाध्यक्षा कौशल्यादेवी शिंदे, माणदेशी साहित्यिक म.ज.घोंगडे, मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मनोगतात म.ज.घोंगडे यांनी आपल्या जीवनात प्रथम माता पिता नंतर शिक्षकांना गुरु मानून विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत अग्रस्थानी राहण्याचे आवाहन करत यशस्वी जीवनाचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला. यावेळी ऋतुजा उबाळे, सोफिया पठाण, ईश्वर चव्हाण, रोहन निंबाळकर, नेहा ठोकळे, जितू निंबाळकर या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना गोडसे, सूत्रसंचालन ताई भालके यांनी केले. आभार विठ्ठलपंत शिंदे यांनी मानले . सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.