मोडनिंब – संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार यांच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या तीर्थक्षेत्र अरणच्या विकास कामांचा सविस्तर कार्य अहवाल महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मंत्रालयातील मुख्यमंत्री दालनात प्रकाशित करण्यात आला.या प्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, बहुजन कल्याण दुग्धविकास दिव्यांग कल्याण मंत्री अतुलजी सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी संत शिरोमणी सावता महाराजांचे वंशज सावता महाराज वसेकर, सचिव ह.भ.प. प्रभु महाराज माळी, ह.भ.प. साखरचंद महाराज लोखंडे,ह.भ.प. महादेव महाराज भुजबळ, युवा व्याख्याते अमर हजारे तसेच ट्रस्टचे पदाधिकारी आणि अरण विकासासाठी सातत्यपूर्ण काम करणारे मंडळी उपस्थित असल्याची माहिती सचिव प्रभू महाराज माळी यांनी दिली. ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षांपासून महाराष्ट्रभर जनजागृती करून संत सावता महाराजांचे शेती व अध्यात्मविषयक विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुरू आहे. त्यासोबतच्या लोकसहभागातून निधी उभारणी करून तीर्थक्षेत्र अरणच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, त्यासोबतच राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठवपुरावा करून अरण तीर्थक्षेत्राला विशेष ‘अ’ वर्ग दर्जा आणि 152 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करुण्यात यश मिळाले आहे. या वेळी “संत सावता महाराजांचा विचार हा शेती, माती आणि माणुसकीला जोडणारा आहे. हा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. तीर्थक्षेत्र अरणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून लागेल तो सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल.”असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर वारीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल जयकुमार गोरे यांचे विशेष कौतुक केले. तसेच लवकरच तीर्थक्षेत्र अरणच्या भूमिपूजन समारंभासाठी उपस्थित राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले असल्याचे प्रभू महाराज माळी यांनी सांगितले.
याप्रसंगी ट्रस्टच्या वतीने दोन प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आले. संत सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पंढरपूरहून अरणला येणाऱ्या पालखीची व्यवस्था विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्यामार्फत करण्यात यावी.संत सावता महाराजांच्या 775 व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचा चरित्र ग्रंथ व ओवीबंध पारायणाची प्रत राज्य शासनाने प्रकाशित करावी.अरण तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी स्पष्ट केले.
















