माढा : विठ्ठल प्रतिष्ठान, निमगाव (टे.) संचलित आर्या कृषी महाविद्यालय, मानेगाव येथे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन उबाळे होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात त्यांनी आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असले तरी शिक्षकांचे स्थान आणि महत्त्व कधीही कमी होणार नसल्याचे स्पष्ट केले. कृत्रिम बुद्धिमत्ता ही विद्यार्थ्यांसाठी ज्ञानप्राप्तीचे प्रभावी साधन असले, तरी योग्य मूल्यसंस्कार, नैतिकता, विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य केवळ शिक्षकच करू शकतात, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी AI चा विवेकपूर्ण व जबाबदारीने वापर करून स्व-अभ्यासाची सवय विकसित करावी. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण, चारित्र्यनिर्मिती आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गुरुजनांप्रती आदर, कृतज्ञता आणि निष्ठा हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रा. खंडेराव वाघे यांनी प्राचीन भारतीय गुरु-शिष्य परंपरेतील आदर्श, त्याग, शिस्त आणि समर्पण यांची वैशिष्ट्ये विविध ऐतिहासिक व प्रेरणादायी उदाहरणांच्या माध्यमातून उलगडून सांगितली. शिक्षक हे केवळ ज्ञानदान करणारे नसून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, नैतिक आणि सामाजिक विकासाचे शिल्पकार आहेत. गुरुंच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करणारे विद्यार्थीच जीवनात यशस्वी होतात, असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यातही त्यांचे मार्गदर्शन लाभत राहावे, अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता गाडेकर यांनी केले, तर किरण पालकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 45