सोलापूर : सराफ बाजारातील एका दुकानात घुसून दोन महिलांनी कामगाराला मारहाण केली आणि सोने आटणी करण्याच्या भट्टीची तोडफोड केली. ही घटना पूर्व मंगळवार पेठ येथे २७ जुलै रोजी सकाळी घडली. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरजाना शेख आणि रेहाना शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे असून याबाबत विलास ज्योतीराम घोरपडे (वय ४१, रा. समृद्धी पार्कवे, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे सोमवार, दि. २७ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता सराफ बाजारातील दुकानात साफसफाई करत होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वरील दोन्ही महिला विनापरवानगी दुकानात घुसल्या. त्यांनी दुकानातील कामगार विकास हनुमंत पवार याची गचीला धरून त्याला शिवीगाळ करत दुकानाबाहेर काढले. त्यानंतर त्यांनी दुकानातील हातोडीने सोने आटणी करण्याची भट्टी फोडली. जाताना महिलांनी स्वतःकडील कुलूप दुकानाला लावून पुन्हा शिवीगाळ केली.
याबाबतची माहिती फिर्यादी घोरपडे यांनी दुकान मालक शिवकुमार कोळी यांना दिली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता या महिलांची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी संबंधित महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. फौजदार राधा जेऊघाले या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.